नागपूर : बनावट शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात आधीच राज्यातील शिक्षण विभागात गदारोळ सुरू आहे. नागपुरातून उघडकीस आलेल्या या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर आढळली. त्या पाठोपाठ आता शहरात बालभारतीच्या बनावट पुस्तकांच्या छापखान्यावर हिंगणा पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकत २० हजारांची पुस्तके ताब्यात घेतली. त्यामुळे शिक्षणिक वर्तूळात पुन्हा एकदा बनावटगीरीमळे खळबळ उडाली आहे. बालभारतीचे अधिकारी राकेश पोटदुखे यांनी दिलेल्या गोपनीय माहिती आणि तक्रारीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) च्या अधिकृत कंत्राटदारांमार्फत शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके छापली जातात. मात्र शहरात अधिकृत कंत्राटदाराला डावलून पुस्तकांच्या बेकायदेशीर आणि छपाईचे एक गंभीर प्रकरण समोर आले. संबंधित टोळी बेकायदेशीररीत्या सरकारी पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती बाजारात वितरित करण्याच्या तयारीत होती.

विद्यार्थ्यांची फसवणूक करत आर्थिक लाभ मिळवण्याचा हा प्रकार असून, यामुळे शैक्षणिक व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरातल्या प्रतिभा प्रिंटर्स नावाच्या छापखान्यावर परवानगीशिवाय बालभारतीची ही पुस्तके छापली जात होती.

या छापखान्यात गणितासह इयत्ता नववी ते बारावीची पुस्तके बेकायदेशीरपणे छापली जात होती. धक्कादायक बाब म्हणजे ही पुस्तके छपाईचे कंत्राट दुसऱ्या अधिकृत कंत्राटदाराला देण्यात आले होते. एमआयडीसी पोलिस सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत.