वर्धा : राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा शासनाने गंभीरतेने घेतल्या आहेत. कॉपीमुक्त महाराष्ट्र हे विशेष अभियान त्यासाठी राबविण्यात येत आहे. ड्रोन नजर, अजामीनपत्र गुन्हा, दक्षता समिती, वेळेतच प्रवेश व अन्य स्वरूपातील उपाय कठोरपणे राबविण्याचे निर्देश आहेत. उद्या मंगळवार रोजी बारावीचा इंग्रजीचा पेपर आहे. त्यादृष्टीने काही बदल झालेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेस १० फेब्रुवारीस होणारा आरंभ लक्षात ठेवून ही काळजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी ३ हजार ३८७ मुख्य केंद्र आहेत. त्यापैकी १७२ केंद्रावर सिसिटीव्ही कॅमेरे लागलेले नसल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले. ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट करीत या १७२ केंद्रावर असलेल्या कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्याचा निर्णय झाला आहे.
अशा केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या केंद्रावर पाठविण्यात आले आहे. या वर्षी १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहे. गत वर्षीच्या तुलनेत ही विद्यार्थी संख्यावाढ २५ हजाराने अधिक आहे. राज्यात २४८ परीक्षा केंद्र ही संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहे. ती केंद्र तसेच अन्य काही परीक्षा केंद्रावर झूम व गुगल मीट या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ९९, ७७३ विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी नोंद झाले आहे. कला शाखेसाठी ३ लाख ८० हजार १५२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २० हजार १५२ विद्यार्थी परीक्षा देणार. यात ८ लाख २० हजार २२९ मुलं असून ७ लाख १२ हजार २४० मुली आहेत. तसेच १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षा केंद्र सुरळीत चालण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची पण सूचना झाली आहे. केंद्र परिसरात १०० मिटर अंतरावर असलेली झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश पूर्वीप्रमाणेच लागू झाले आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांना या परीक्षेबाबत दक्ष राहण्याची सूचना झाली आहे. केंद्रावर विद्यार्थी काय साहित्य सोबत ठेवू शकतात तसेच काय वर्ज्य याबाबत पण राज्य मंडळाने स्पष्ट सूचना केल्या आहेत.
