यवतमाळ : दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यांत होत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यास व परीक्षेसंदर्भातील अडचणी, शंका किंवा समस्या दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, तणावमुक्त वातावरणात तयारी करता यावी आणि शंका मिटविता यावी, या उद्देशाने हे समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी तज्ज्ञ समुपदेशकांची मदत घेता येईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सकारात्मक मानसिकतेने आणि तयारीसह सामोरे जाणे आवश्यक आहे. शांत मनाने, वेळापत्रकानुसार अभ्यास करून आणि समुपदेशक व हेल्पलाइनच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतल्यास, परीक्षा काळात तणाव कमी राहील आणि उत्तम कामगिरी करता येईल, असा विश्वास मंडळाला आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, शंका मिटविता याव्यात आणि परीक्षा तयारीत कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी ही तज्ज्ञ समुपदेशक विद्यार्थांना उपलब्ध राहणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील शंका मिटविण्यासाठी तज्ज्ञ समुपदेशकांचे संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी किंवा पालक हे क्रमांक वापरून थेट समुपदेशकांशी संपर्क साधू शकतात.
विद्यार्थ्यांना परीक्षेबाबतची माहिती मिळावी आणि शंका निरसन करता याव्यात, यासाठी राज्य बोर्डाने ही हेल्पलाइन सुविधा सुरू केली आहे. दहावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८९३७५६) तर बारावीच्या परीक्षेसंदर्भात माहिती व मार्गदर्शनासाठी (०२२-२७८८१०७५) हे क्रमांक दिले आहेत.
विद्यार्थ्यांना परीक्षा स्वच्छ आणि शांततापूर्ण व तणावमुक्त वातावरणात देता यावी यासाठी, परीक्षा केंद्रांत उमेदवारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह, वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी भिंतीवरील घड्याळ आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. परीक्षा हॉलमध्ये काही बाबींची कठोर मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थी मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने, नोट्स किंवा इतर कोणतेही सहायक साहित्य घेऊन जाऊ शकत नाहीत. नियमांचे उल्लंघन झाल्यास परीक्षा रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात येत आहे. त्यासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाकडून त्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

