नागपूर : यंदाच्या राज्यातील अर्थसंकल्पात विविध क्षेत्राला काय मिळाले याबाबत संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ काही खुशी काही गम अश्या प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळाला काय मिळाले? याबाबत खुद्द प्रवाश्यांमध्येही उत्सुकता आहे. एसटी महामंडळाला काय मिळाले याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने माहिती दिली आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एसटी) काही आर्थिक तरतूद करण्यात आली असली तरी ती तोट्यातील एसटीसाठी अपुरी असून त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी ही तरतूद “थोडी खुशी, थोडा गम” अशीच आहे. एसटी हे राज्यातील गरीब आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचे प्रमुख साधन असून त्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असताना सरकारला त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि एसटी सक्षम करण्यासाठी भविष्यात ८ हजार ३०० नव्या बसगाड्या खरेदी करण्याचा संकल्प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यासाठी आणि इतर विकासकामांसाठी किमान ८ हजार कोटी रुपयांची गरज असताना अर्थसंकल्पात केवळ २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे बरगे यांनी नमूद केले. यंदाच्या अर्थसंकल्पात एसटी महामंडळाच्या सवलत मूल्य प्रतिपूर्तीसाठी सुमारे ३ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे दिसून येते. या तरतुदीतून कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा प्रश्न काही प्रमाणात पूर्ण सुटला नाहीतरी काही प्रमाणात सुटू शकतो, ही बाब निश्चितच दिलासादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटी सारख्या रक्कमा अद्याप संबंधित ट्रस्टकडे जमा करण्यात आलेल्या नाहीत. तसेच वाढीव महागाई भत्ता देखील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. एकूण सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपयांची वैधानिक देणी प्रलंबित असल्याने एसटीला भरीव आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, असे बरगे यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर किमान पुरवणी मागण्यांमध्ये तरी सरकारने एसटीसाठी अतिरिक्त निधीचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.