नागपूर: राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प साजरा केला. त्यात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात स्टील प्रकल्प उभारून तेथे ७० हजारावर रोजगार निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली. या शिवाय खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यातील रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे.

नागपूरकर देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार म्हटल्यावर विदर्भाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला निराश केले नाही. नक्षलवादग्रस्त जिल्हा म्हणून पूर्वी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्या्ची तेथे होऊ घातलेल्या मोठ्या स्टील प्रकल्पामुळे नवी ओळख तयार होत आहे. या जिल्ह्यत नवे स्टील हब उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तेथे विशाल,अतिविशाल स्टील उद्योगाच्या माध्यमातून २ लाख ६२ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यातून ७० हजारहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी विशेष रस्ते विकास कार्यक्रम, खाण मार्गाचे जाळे विकसित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धनासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असून त्यातून पाच कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. यापूर्वी विदर्भातील सुधीर मुनगंटीवार यांनी ते अर्थमंत्री व वनमंत्री असताना तीन कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली होती त्याचे काय झाले असा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो.

रामटेकमध्ये रामसृष्टी व कालीदास सृष्टी

नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे प्रसिद्ध तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. राम वनवासात गेले असता त्यांनी काही काळ रामटेकमध्ये वास्तव्य केले होते,अशी आख्यायिका आहे. या स्थळाचे पौराणिक महत्व लक्षात घेता येथे पर्यटनस्थळ वि्कसित करण्यात येणार आहे. याच प्रयन्ताचा एक भाग म्हणून रामटेक येथे रामसृष्टी व कालिदास सृष्टी उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी निधीचा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार आहे.

राज्यातील तिसरी नगरी नवरगावमध्ये

विदर्भ हा निसर्गरम्य परिसर आहे. येथे तीन व्याघ्र प्रकल्प आहेत. अनेक नद्या आणि पौराणिक स्थळे आहेत. या भागात चित्रनगरी स्थापन करावी अशी मागणी अनेक वर्षापासून आहे. मधल्या काळात त्याची घोषणाही करण्यात आली होती. ही चित्रनगरी नवनगाव, रामटेक येथे विकसित करण्यात येणार आहे. यातून विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.