गडचिरोली : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून संभाव्य मंत्र्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असून जिल्हा सध्या राज्यातील सर्वाधिक वेगाने औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक ठरत असल्याने यावेळी गडचिरोलीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. भाजपचे गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते, तर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते व अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचेही नाव मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत आहे.
प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधण्याच्या दृष्टीने…
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधण्याच्या दृष्टीने गडचिरोलीचा गांभीर्याने विचार केला जात असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सुरू असलेला औद्योगिक विस्तार, लोहखनिजावर आधारित प्रकल्प, स्टील उद्योगांसाठी होत असलेली अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि वाढते आर्थिक महत्त्व यामुळे राज्याच्या विकासाच्या नकाशावर गडचिरोली जिल्हा केंद्रस्थानी आला आहे.
…यामुळे गडचिरोलीकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष
गेल्या काही वर्षांत सूरजागड परिसरातील खाण प्रकल्प, प्रस्तावित स्टील उद्योग, पायाभूत सुविधा आणि विविध औद्योगिक गुंतवणुकीमुळे गडचिरोलीकडे राज्य सरकारचे विशेष लक्ष आहे. या विकासकामांना अधिक गती देण्यासाठी जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व असणे आवश्यक असल्याची भावना महायुतीतील अनेक नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
‘या’ नावांची चर्चा
भाजपच्या दृष्टीने डॉ. मिलिंद नरोटे हे आदिवासी समाजातील तरुण नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. गडचिरोली मतदारसंघातून मिळालेल्या विजयामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले असून मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेले अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम हे महायुतीतील अनुभवी चेहरा असून आदिवासी पट्ट्यातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता त्यांच्याही नावाचा गंभीरपणे विचार होत असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील घटक पक्षांचा समतोल, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित लक्षात घेऊन निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात तरी गडचिरोलीला मंत्रिपद मिळणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
औद्योगिक विकासामुळे जिल्ह्याचे वजन वाढले
एकेकाळी नक्षलग्रस्त आणि दुर्गम जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची ओळख आता औद्योगिक गुंतवणुकीच्या केंद्र म्हणून निर्माण होत आहे. लोहखनिजावर आधारित उद्योग, स्टील प्रकल्प, मोठ्या प्रमाणावर जाहीर झालेली खासगी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे जिल्ह्याचे आर्थिक महत्त्व झपाट्याने वाढले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने गडचिरोलीकडे सरकारचे विशेष लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व देऊन विकासाला अधिक गती देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
