नागपूर : मध्यभारतातील महत्त्वाच्या व्याघ्र मार्गिकेत सक्रिय असलेल्या आंतरराज्यीय वन्यजीव तस्करी साखळीला मोठा धक्का देत दोन वाघांच्या कातड्यांसह तिघांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर ‘ऑपरेशन सेफ पॅसेज’ अंतर्गत झालेल्या या कारवाईत वाघांची कातडी आणि अवयव जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अनुसूची एकमधील वन्यजीवांच्या तस्करीचे जाळे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाघाची कातडी, पंगोलिनचे खवले

छत्तीसगडमधील उदंती-सीतानदी व्याघ्रप्रकल्पाच्या शिकारीविरोधी पथकाने वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (डब्ल्यूसीसीबी), राज्यस्तरीय भरारी पथक, पश्चिम भानुप्रतापपूर वनविभाग आणि गडचिरोली पोलिसांच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बांदे परिसरात बाबूराव मडावी आणि बिजेश्वर गेडाम यांना दुचाकीवरून दोन वाघांची कातडी वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

कारवाईनंतर गेडामच्या अहेरी येथील घराची झडती घेण्यात आली. यावेळी सुमारे पाच किलो खवले मांजराचे खवले जप्त करण्यात आले. दरम्यान, इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने बीजापूर जिल्ह्यातील नेटीवाडा गावातून तुलसीराम माजी या संशयित शिकाऱ्यालाही अटक केली. प्राथमिक तपासानुसार जप्त करण्यात आलेल्या वाघांची शिकार इंद्रावती-अबुझमाड परिसरात करण्यात आल्याचा दाट संशय आहे.

यापूर्वीही वाघांची कातडी जप्त

उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्पाच्या शिकारीविरोधी पथकाने २०२३ मध्येही महाराष्ट्र आणि बीजापूर येथे संयुक्त कारवाया करून दोन वाघांची कातडी जप्त केली होती. तसेच एप्रिल २०२६ मध्ये अबुझमाड परिसरात नऊ विशाल भारतीय खारींची शिकार करणाऱ्या शिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. वन्यजीव गुन्ह्यांविरोधात ‘शून्य सहनशीलता’ धोरण कायम ठेवत अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्ष शिकार करणारे आणि कातडींच्या व्यापाराशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पश्चिम भानुप्रतापपूरचे विभागीय वनाधिकारी एस. नवीनकुमार यांनी दिली.

मध्य भारतातील महत्वाची मार्गिका

गडचिरोलीची जंगले, इंद्रावती व्याघ्र प्रकल्प, अबुझमाड, उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प आणि ओडिशातील सुनाबेडा अभयारण्य यांना जोडणारी सुमारे ४०० किलोमीटर लांबीची मार्गिका मध्य भारतातील सर्वात महत्त्वाच्या वन्यजीव मार्गिकांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील व्याघ्रबहुल क्षेत्रांमधून स्थलांतर करणाऱ्या वाघांसाठी हा नैसर्गिक मार्ग मानला जातो. आशियाई हत्ती, गवे, रानम्हशी आणि अन्य वन्यजीवांच्या आनुवंशिक देवाणघेवाणीसाठीही या मार्गिकेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या परिसरात सक्रिय असलेल्या तस्करी साखळीवर झालेली कारवाई संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, असे उदंती-सीतानदी व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक वरुण जैन यांनी सांगितले.