नागपूर : ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून  सहा प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजप सरकारने घेतलेले बळी आहेत, याची चौकशी तर केलीच पाहिजे पण घटनेला जबाबदार धरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

रेल्वे अपघातावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या अकरा वर्षापासून महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता पायाभूत सुविधा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार या पोकळ गप्पा ऐकत आहे. सुविधा आणि विकासाच्या नावाखाली टेंडर द्या आणि कमिशन घ्या हा खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदार यातून गब्बर झाले आहे पण या भ्रष्टाचाराची किंमत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना आपला जीवाने चुकती करावी लागते आहे.

सरकारने आता तरी जागे होऊन, इव्हेंटबाजी सोडून मुंबईकरांचे लोकल प्रवासात जीव जाऊ नयेत यासाठी तातडीने पावले उचलावीत. मुंबई परिसरात लोकल हीच लाईफलाईन आहे, दररोज जवळपास ७५ लाख लोक लोकलने प्रवास करतात पण हा प्रवास अत्यंत खडतर व कठीण आहे. घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी परत येईल का याची चिंता सारखी सतावत असते. लोकलमधील गर्दीमुळे दररोज अपघात होतात, कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो किंवा कायमचा जायबंदी होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकलमधील गर्दी कमी करून हा प्रवास सुखकर करावा यासाठी सातत्याने चर्चा होते, बैठका होतात पण पुन्हा ‘पहिले पाढे ५५’ अशी अवस्था आहे. एखादा अपघात झाली की तातडीने लोकलला बंद दरवाजे बसवण्याची घोषणा केली जाते पण कृती शून्य असते. रेल्वे प्रशासन हे मुर्दाड आहे, सुस्तावलेला अजगर आहे. सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने लोकलच्या समस्यांवर आवाज उठवलेला आहे पण रेल्वे प्रशासन व सरकार यांची कुंभकर्णी झोप काही जात नाही. भाजपा सरकारला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करायचा आहे, मुंबईकरांना बुलेट ट्रने नाही तर लोकल सेवा व्यवस्थित पाहिजे. पण रेल्वे प्रशासन व सरकार सर्वसामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे आता हा खेळ थांबवा असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.