नागपूर : काँग्रेसवर हिंदूविरोधी अशी टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला हिंदू धर्माचे निर्गुण, निराकार हे स्वरूप मान्य आहे का, असा सवाल करीत धर्म म्हणजे काय हे त्यांनी जाहीर करावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
नागपूर दौऱ्यावर असलेल्या सपकाळ यांनी सोमवारी दैनिक लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव संदेश सिंगलकर होते. यावेळी सपकाळ यांनी राज्यातील राजकीय घडामोडी, शेतकरी, युवकांच्या प्रश्नांवर भाष्य केले. भाजपकडून काँग्रेसवर होणारा धर्मविरोधी आरोपाचा सपकाळ यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, शिवरायांना राज्यभिषेक करण्यास नकार देणे, संतांना ग्रंथ बुडवायला लावणे, महिलांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून झटणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना विरोध करणे म्हणजे धर्म होय का? धर्म म्हणजे काय हे भाजपने सांगावे. फडणवीस हे धर्माधिकारी आहेत का, हे त्यांनी जाहीर करावे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र धर्म आम्ही म्हणतो. निर्गुण निराकार हे हिंदू धर्माचे स्वरुप त्यांना मान्य का, असा सवालही त्यांनी केला.
शिक्षणाचे वाटोळे, नोकर भरती बंद
आधी महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु, आता चित्र बदलले आहे. भाजपने जातीयवाद वाढवला. बचत गटावर ‘मायक्रो फायनान्स’च्या नावाने सावकार बसवला, शिक्षणाचे वाटोळे केले, नोकरभरती बंद केली, त्यामुळे तरुणांमध्ये निराशा आहे, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
राज्यातील शेतकरी अडचणीत
राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत, त्यांच्या शेतमालाला बाजारात भाव मिळत नाही, सोयाबीनचे दर पडले आहेत, विदेशातील तूर बाजारात विक्रीसाठी येत आहे. अशा स्थितीत त्यांना भाव कसा मिळणार? डॉ. मनमोहनसिंग पतप्रधान असताना शेतमालाच्या हमीभावात १२० टक्के वाढ झाली होती. मोदींनी अकरा वर्षांच्या काळात फक्त ४५ टक्के वाढ केली. एकीकडे हमीभावात वाढ केली नाही आणि दुसरीकडे कृषी साहित्याच्या किंमतीत वाढ केली, जीएसटी आकारण्यात येऊ लागली. मोदींनी ‘घर घर तिरंगा’ अभियान राबवले. देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे व घरांची संख्या ४० कोटी आहे. या सर्व ठिकाणी खादीचा तिरंगा फडकावला असता तर १२० कोटी किलो कापूस लागला असता व त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला असता. पण, तसे न करता त्यांनी आवडत्या उद्योगपतींच्या व चीनमधील पॉलिस्टरचा वापर केला, याकडेही सपकाळ यांनी लक्ष वेधले.
फडणवीसांचा गडचिरोली मुक्काम व्यावसायिक हितासाठी
गडचिरोली जिल्ह्यात चारवेळा मुक्काम केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असले तरी तो मुक्काम तेथील आदिवासींसाठी नव्हता तर व्यावसायिक हितसंबध जोपासण्यासाठी होता, अशी टीका सपकाळ यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यात सुरू झालेल्या खाण प्रकल्पांकडे त्यांचा अंगुलीनिर्देश होता.
संघटनात्मक बदल लवकरच
काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल केले जाणार आहेत. देश पातळीवरच हे धोरण ठरले आहे. भाजपला उघडे पाडण्यासाठी आम्ही मोर्चे, पदयात्रा काढत आहोत. पक्ष मजबूत करण्यावर आमचा भर असेल, असेही सपकाळ म्हणाले.