वास्तवाचे भान सुटले की माणूस ताळतंत्र सोडून वागू लागतो. काँग्रेसच्या नेत्यांचे अगदी तसेच झाले आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिकच्या निवडणुकीत या पक्षाला दणकून पराभव स्वीकारावा लागला हे वास्तव. त्याकडे दुर्लक्ष करून वाटेल तशी वक्तव्ये करून पक्षाची आणखी ‘शोभा’ करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाहीत. यात आघाडी घेतलीय ती चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी.

विदर्भात केवळ याच जिल्ह्यात पक्षाला थोडेफार यश मिळाले. त्याने हुरळून जाण्याचे काही कारण नाही. कारण इतर ठिकाणचे अपयश दारुण व नेत्यांच्या निष्ठाविक्रीचे वाभाडे काढणारे. अशा स्थितीत मिळालेल्या माफक यशाने हुरळून न जाता पक्षांतर्गत परिस्थितीला शांतपणे सामोरे जाणे हेच कोणत्याही नेत्याचे कर्तव्य ठरते. त्याचा विसर या खासदारांना पडला. शेवटी व्हायचे तेच झाले.

सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा काँग्रेसला चंद्रपुरात महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. याचे सविस्तर विश्लेषण पुढे करूच, पण सामान्य जनतेने दिलेल्या पाठिंब्याची हे नेते कशी वाट लावतात याचे हे उत्तम उदाहरण. घर फिरले म्हणजे घराचे वासे फिरतात हेच यातून दिसले. इकडे नागपुरात तर कहर झाला.

महापौरपदाच्या पदग्रहण साेहळ्याची जाहिरातबाजी करताना भाजपने चक्क एका काँग्रेस नेत्याचे छायाचित्र त्यांच्या फलकावर प्रकाशित केले. विजयासाठी विरोधी पक्षाच्या नेत्याचे आभार मानण्याची ही पद्धत अनेकांना बुचकाळ्यात टाकून गेली. अपवाद फक्त काँग्रेसमधील इतर नेत्यांचा. त्यांना हे संगनमताचे मेतकूट किती घट्ट आहे याची जाणीव आधीच झालेली. ऐन निवडणुकीच्या आधी शहर काँग्रेसमधील नेते भाजपशी कसे संधान साधून आहेत याचे दाखले देत अनेकांनी आरोप केलेले. त्याचे प्रतिबिंब या फलकातून उमटले असा अर्थ आज कुणी काढला तर त्यात चूक काय? छायाचित्र वापरण्याचा प्रकार चुकीने घडला अशी सारवासारव आता केली जाईल, पण यातून विश्वासार्हता लयाला गेली. निष्ठेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले त्याचे काय? हे सिंडीकेटच या पक्षाला अलीकडे सतत मारक ठरत आहे.

उमेदवार ठरवताना त्याचा परिचय अनेकांना पदोपदी आलेला. निवड मंडळाच्या बैठकांमधून उठून बाहेर जात ‘सांगा कुणाचे नाव ठरवू ते’ असे सत्ताधाऱ्यांना विचारणारे नेते अनेकांना पहिल्यांदा दिसलेले. अशास्थितीत जवळजवळ ४५ टक्के मते मिळवूनही या पक्षाला ३५च्या आत जागा मिळाल्या. सत्तेच्या प्रभावात येऊन हरण्यासाठी उमेदवार उभे करणारा हा नागपुरातला एकमेव पक्ष. दर पाच वर्षांनी निवडणूक लढायची. हरायचे व पक्षावर नियंत्रण ठेवून राहायचे. समर्थकांच्या बाबतीतही तेच धोरण. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनात आपल्याविषयी आत्मीयता वाढते व चार-दोन कामे मार्गी लावून घेता येतात इतका या नेत्यांचा स्वार्थी दृष्टिकोन. पक्ष गेला खड्ड्यात.

मध्यंतरी राहुल गांधींनी गुजरातमध्ये बोलताना अशा आतून संधान साधून असलेल्या नेत्यांवर तोफ डागली होती. भाजपशी हातमिळवणी करणाऱ्यांनी बाहेर पडावे असे आवाहनही केले होते. गांधी कितीही बोलले तरी आपल्याला काढून टाकण्याची हिंमत पक्षात नाही याची पुरेपूर कल्पना या नेत्यांना आहे. याचे एकमेव कारण म्हणजे पक्षाची दुबळी अवस्था. ती सुधारू नये असाच प्रयत्न या नेत्यांनी प्रत्येक निवडणुकीत चालवलेला. एकदा का पक्ष मजबूत झाला तर संगनमत उघडे पडेल हीच या नेत्यांना भीती.

अशा मनोवृत्तीत हा पक्ष कधीच दणकट होणार नाही. मात्र त्याची फिकीर या नेत्यांना नाही. नागपूरचा विचार केला तर याला अपवाद फक्त एकाच व्यक्तीचा. ते म्हणजे सुनील केदार. त्यांनी भाजपची ऑफर धुडकावली. नंतर त्यांच्या एकेक समर्थकांच्या मागे तपासयंत्रणांचा ससेमिरा लागला. तो अजून थांबलेला नाही.

असे इतर नेत्यांच्या बाबतीत का होत नाही याचे उत्तर सत्ताधाऱ्यांशी त्यांनी जुळवून घेण्यात दडलेले. अशास्थितीत हा पक्ष कसा वाढणार? अजूनही लाखो मतदार या पक्षाला मतदान करतात पण या विक्रीकौशल्यात वाकबगार झालेल्या नेत्यांना त्याची काही फिकीर नाही. विक्री वा खपासाठी काहीही करणारा व्यापारी व यांच्यात काही फरकच उरला नाही. विदर्भातील इतर ठिकाणी सुद्धा कमी-अधिक फरकाने चित्र हेच.

अमरावतीत सत्ताधाऱ्यांमध्येच इतकी भांडणे होती की लोकांना त्याचा उबग आलेला. ऐन प्रचाराच्या काळात हा तमाशा सुरू होता. तरीही त्याचा लाभ काँग्रेसला घेता आला नाही. सुदैवाने इथे विकले जाणारे नेते नाहीत पण त्यांच्यातला अहंकार, सरंजामी वृत्ती तीव्र. पायाखालची जमीन पूर्णपणे सरकलेली तरीही अहंगंडात वावरणे, सर्वांना सोबत घेणे, यासाठी नम्रता दाखवणे याचा लवलेशही कुणात नाही. प्रत्येक जण आपापला फाटका तंबू सांभाळण्यात मग्न असलेला. घर पडले तरी चालेल पण दुराग्रह सोडणार नाही या भूमिकेत वावरणारा. त्यामुळे संधी असूनही पक्षाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. हातची संधी कशी घालवायची याचे अमरावती हे उत्तम उदाहरण.

अकोल्यात तर या पक्षाकडे नेतृत्वच नाही. गाळात गेलेल्या नेत्यांची पोरेसोरे हा पक्ष चालवतात. म्हणायला एक आमदार आहे पण तो अल्पसंख्य. त्याने त्याच्या क्षेत्रात बरी कामगिरी करून दाखवली पण इतरांचे काय? येथे वंचित व इतर समविचारींशी युती करून सहज विजय मिळवता आला असता पण तसे धोरण व दूरदृष्टीचा अभाव प्रत्येकात ठासून भरलेला.

सत्ताधाऱ्यांना विकले जाणे इथे नव्हते पण त्यांना अनुकूल ठरेल अशी परिस्थिती या नेत्यांनी तयार केली. या सर्व गदारोळात समाधानाची गोष्ट एकच. ती म्हणजे या पक्षाला हर्षवर्धन सपकाळांच्या रूपात चांगला प्रदेशाध्यक्ष लाभलेला. किमान आतातरी त्यांनी कणखरपणा दाखवण्याची गरज या निकालांनी अधोरेखित केली आहे.

विधिमंडळातील पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक आहेत. ते अनेकदा सत्ताधाऱ्यांना पुरून उरतात. त्यामुळे त्यांच्यात व धानोरकरांमध्ये वाद होताच सपकाळांनी तातडीने धाव घेत मध्यस्थी केली. हा वाद सुटावा यासाठी साऱ्यांना दिल्लीत नेले. तिथे तोडगा निघाला. अशीच सक्रियता त्यांनी इतर ठिकाणी सुद्धा दाखवणे गरजेचे. नागपुरात विकल्या गेलेल्या नेत्यांना भाजपच्या विरुद्ध थेट मोर्चा तसेच आंदोलन उभे करण्याचा आदेश सपकाळांनी एकदा देऊन बघावा. हे नेते पार उघडे पडतील.

पालिकेच्या अधिकाऱ्यांना, कचरा कंपन्यांना वेठीस धरून भाजपविरुद्ध जनमत पेटवता येत नाही. त्यासाठी थेट संघर्ष हाती घेणे गरजेचे. नेमके तिथेच या नेत्यांचे हितसंबंध आड येतात. ते उघडे पाडायचे असेल तर सपकाळांनी वेळीच पावले उचलणे गरजेचे. अन्यथा येत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी हा पक्ष नागपुरातून नामशेष झालेला दिसेल.