बुलढाणा : राज्यातील अध्यापक विद्यालयांमधील रिक्त जागा भरण्यासाठी डिप्लोमा इन एलीमेंट्री एज्युकेशन (डी.एल.एड.) प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. मात्र अर्ज करण्यासाठी पाचच दिवस उरले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना १२ जुलै २०२६ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंतच ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. त्यामुळे इच्छुक विध्यार्थ्यांनी तातडीने हालचाल करणे आवश्यक आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्त्वावर प्रवेश
संबंधित जिल्ह्यातील अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या फेरीतील प्रवेश ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर दिले जाणार आहेत. विशेष फेरीत यंदा इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेले व नव्याने डी.एल.एड. प्रवेशासाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी, नियमित प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज पूर्ण न भरलेले किंवा अर्जात आवश्यक दुरुस्ती न केलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. एवढेच नव्हे तर, यापूर्वी कोणत्याही प्रवेश फेरीत प्रवेश न घेतलेले विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.
शुल्क भरले असेल तर…
नियमित प्रवेश प्रक्रियेत अध्यापक विद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध रिक्त जागांनुसार आपल्या पसंतीक्रमात बदल करावा. तसेच संबंधित अध्यापक विद्यालयांचा समावेश करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी डी.एल.एड. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन शुल्क भरले असले, मात्र प्रत्यक्ष प्रवेश घेतला नसलेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी पुन्हा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. मात्र, पूर्वी नोंदविलेलाच ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक वापरणे बंधनकारक राहणार आहे.
ही काळजी घ्या
अर्ज मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमधील सातव्या टप्प्यात जाऊन ‘क्लिक टू फाईन्ड सीट अँड टेक ऍडमिशन’ या पर्यायाद्वारे विभाग, जिल्हा व अध्यापक विद्यालयाचा प्रकार निवडून रिक्त जागा असलेल्या संस्थेत प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित विद्यालयाची खात्री करूनच ‘यस कन्फर्म सीट’ या पर्यायावर क्लिक करावे. एकदा प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून चार दिवसांच्या आत संबंधित अध्यापक विद्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- ८ ते १२ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज सादर करणे.
- १३ जुलैला पडताळणी अधिकाऱ्यांकडून ऑनलाइन प्रमाणपत्र पडताळणी.
- १४ जुलैला (दुपारी २ वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांकडून अर्जातील दुरुस्ती व सायंकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्त अर्जांची अंतिम पडताळणी केली जाईल.
- १५ जुलैला सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून अध्यापक विद्यालय निश्चित करून प्रवेशपत्र डाउनलोड करणे.
- २० जुलैला सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित अध्यापक विद्यालयांकडून विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष ऑनलाइन प्रवेश निश्चित करणे.
