नागपूर : राज्यातील चार शासकीय दंत महाविद्यालये व रुग्णालयांपैकी तीन महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये ६५ ने वाढ होणार आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याने शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देणार असल्याचे खुद्द वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी एका बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठात्यांना सांगितले. दरम्यान राज्यातील कोणत्या महाविद्यालयांमध्ये या जागा वाढणार? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
केंद्र व राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून दंत पदव्युत्तर शिक्षणाची क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे. इंडियन डेंटल असोसिएशनकडूनही सातत्याने दंतच्या पदव्युत्तर जागा वाढवण्याची मागणी होत आहे. सध्या राज्यातील मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आहे. त्यापैकी जळगाव वगळता सर्वत्र पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. विद्यार्थ्यांकडून असलेल्या मागणीच्या तुलनेत या शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा मर्यादित असल्याने अनेक पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. नव्या जागांमुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, दंतच्या पदव्युत्तर जागा वाढवण्यासाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव येथे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय या तिन्ही महाविद्यालयांमध्ये २० प्राध्यापक आणि २० सहाय्यक प्राध्यापकांची नवीन नियुक्ती करावी लागणार आहे.
हिवाळी अधिवेशनदरम्यान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात बैठक घेतेली. त्यात जागा वाढल्यास त्यासाठी आवश्यक बहुतांश पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचे सर्वच अधिष्ठात्यांनी सांगितले. त्यामुळे मुश्रीफ यांनी तातडीने प्रक्रिया करण्याची सूचनाही संबंधितांना केली. सध्या हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याकडून शासनाकडे गेला आहे. शासनाकडून मंजुरी मिळताच तातडीने जागा वाढिसाठीची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे. या विषयावर वैद्यकीय संचालक अजय चंदनवले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही.
अधिकाऱ्यांचे म्हणणे काय ?
दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर जागा वाढवण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सचिव धीरज कुमार आणि सर्वच आग्रही आहेत. त्यावर नागपुरातील हिवाळी अधिवेशनदरम्यान झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण खात्याचे संचालक डाॅ. अजय चंदनवाले, सहसंचालकांसह सगळ्याच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठात्यांसह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वैद्यकीय समन्वयक डाॅ. वैभव कारेमोरे यांनी दिली. डाॅ. वैभव कारेमोरे हे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांत कार्यरत असून इंडियन डेंटल असोसिएशनचे पदाधिकारीही आहेत.
