नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या खासगी विमानातून ते प्रवास करत होते, तेच विमान यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्येही अपघातग्रस्त झाले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विमानाच्या तांत्रिक सुरक्षिततेबाबत आणि देखभाल प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर उतरत असताना “Learjet 45” प्रकारच्या या खासगी विमानाचे नियंत्रण सुटले. लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवर आदळले आणि काही क्षणांतच त्याला आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह वैमानिक आणि अन्य तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळावरील दृश्ये अत्यंत विदारक होती. विमानाचे तुकडे विखुरले गेले होते, तर आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अग्निशमन दल आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
२०२३ मधील अपघाताची पार्श्वभूमी
याच “Learjet 45XR” विमानाला १४ सप्टेंबर २०२३ ला मुंबई विमानतळावर लँडिंग करताना अपघात झाला होता. विशाखापट्टणम येथून मुंबईकडे येणाऱ्या या विमानाने मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेच्या स्थितीत धावपट्टीवरून घसरत अपघात केला होता. त्या वेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, त्या वेळी विमानाचा उड्डाणप्रवास सुरळीत होता. मात्र मुंबई विमानतळावर जोरदार पाऊस, कमी दृश्यता आणि वाऱ्याच्या बदलत्या दिशेमुळे लँडिंगवेळी परिस्थिती बिकट झाली होती. तरीही या अपघातानंतर विमान पुन्हा सेवेत कसे आणले गेले, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तपासाला गती
आजच्या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि संबंधित यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. विमानाच्या देखभालीचा इतिहास, तांत्रिक तपासणी अहवाल, तसेच वैमानिकांशी संबंधित तपशील तपासले जाणार आहेत. ब्लॅक बॉक्स सापडल्यास अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्यात आणि देशाच्या राजकारणात अजित पवार यांच्या निधनामुळे शोककळा पसरली असून, अनेक राजकीय नेत्यांनी आणि मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान, एका विमानाला वारंवार अपघाताचा इतिहास असूनही ते वापरात ठेवण्यात आल्याने विमान सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
