नागपूर : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाविरोधात राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात संघर्ष तीव्र झाला आहे. या निर्णयाला विरोध करत सेंट्रल मार्डने ५ ऑगस्टपासून राज्यव्यापी नियमित वैद्यकीय सेवा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्याआधी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रच्या हाकेनुसार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत खासगी डॉक्टर २४ तास सेवा बंद ठेवणार असून नागपुरातही डॉक्टरांचे आंदोलन होणार आहे.

राज्यातील निवासी डॉक्टर संपावर का जाणार आहेत?

सेंट्रल मार्डने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंतिम निवेदन सादर करून सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याची प्रक्रिया न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर निवासी डॉक्टरांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. अनेक बैठका आणि निवेदने देऊनही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे मार्डने स्पष्ट केले.

संप कधीपासून सुरू होणार?

सेंट्रल मार्डने ५ ऑगस्टपासून राज्यभर नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून संपाच्या पहिल्या २४ तासांत आपत्कालीन सेवा, अपघात विभाग आणि जीव वाचविणाऱ्या सर्व सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या भूमिकेनुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.

हेही वाचा

आयएमएचे आंदोलन कशासाठी?

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय पद्धतीसाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याचा प्रस्ताव हा रुग्णांच्या सुरक्षिततेच्या आणि पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभर २४ तास सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी डॉक्टरांची कामबंद कधी?

आयएमए महाराष्ट्रच्या आवाहनानुसार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभर २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात अनेक खासगी दवाखाने आणि रुग्णालयांतील नियमित बाह्यरुग्न सेवा बंद राहण्याची शक्यता आहे.

नागपुरात काय होणार?

आयएमए नागपूरच्या कार्यालयात ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉक्टरांची बैठक आणि निदर्शने होणार आहेत. राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

रुग्णांवर काय परिणाम होऊ शकतो?

४ ऑगस्ट रोजी खासगी डॉक्टरांच्या २४ तासांच्या कामबंदमुळे नियमित तपासणी, ओपीडी आणि नियोजित उपचारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ५ ऑगस्टपासून निवासी डॉक्टरांनीही नियमित सेवा बंद केल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आपत्कालीन आणि जीव वाचविणाऱ्या सेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन डॉक्टर संघटनांनी दिले आहे.

सरकारकडे डॉक्टरांची नेमकी मागणी काय?

न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी देण्याची प्रक्रिया थांबवावी, निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि यासंदर्भात त्वरित चर्चा सुरू करावी, अशी प्रमुख मागणी डॉक्टर संघटनांनी केली आहे. सरकारने तातडीने संवाद साधून तोडगा काढावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.