नागपूर : मतदार याद्याच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिम राबविण्यात आली असून ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या प्रारूप यादी नाव आहे की नाही, याची माहिती आयोगाने दिलेल्या वेबसाईटवर बघता येणार आहे. ceo.maharashtra.gov.in, voters.eci.gov.in यावर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. त्याच प्रमाणे तुमच्या भागातील बीएलओ यादी असेल. त्यांच्याकडूनही याची माहिती घेता येईल.

सर्वात प्रथम यादीत नाव आहे का? हे तपासून घ्या, त्याच सोबतच नावाची स्पेलिंग बरोबर आहे का, वय/जन्मतारीख, फोटो, पत्ता योग्य आहे का?, मतदार क्रमांक (EPIC) आणि मतदान केंद्र योग्य आहे का, हे ही तपासून घ्यावे, नाव, पत्ता, वय, फोटो इत्यादीमध्ये त्रुटी असल्यास त्यासाठी दावा/हरकत दाखल करता येते. त्याच प्रमाणे नाव, पत्ता, वय, फोटो यात काहीही चूक असेल तर दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ भरता येईल.

विशेषतः वृद्ध व्यक्ती, स्थलांतरित सदस्य किंवा ज्यांचे नाव एसआयआरमध्ये पडताळले गेले नाही अशांची नावे काळजीपूर्वक तपासा घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

नाव गायब असेल तर घाबरू नका

प्रारूप यादी म्हणजे अंतिम यादी नाही. नाव वगळले गेले असल्यास ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावा करून नाव समाविष्ट करण्याची संधी आहे.
जर २०२५ च्या मतदार यादीत नाव होते पण २०२६ च्या प्रारूपमध्ये नाही, तर महाराष्ट्र सीईओच्या एसआयआर पोर्टलवर अशा मतदारांसाठी स्वतंत्र एएसडीडी (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर जावून माहिती घेता येणार आहे.

दावे-हरकती दाखल करता येतील

सर्वात महत्त्वाचे, ३१ ऑगस्टला यादी पाहिल्यानंतर नाव नसल्यास “आता काही करता येणार नाही” असे अजिबात नाही. उलट त्या दिवसापासून दावा दाखल करण्यासाठी महत्त्वाचा कालावधी सुरू होतो. प्रारूप यादी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील. त्यानंतर त्यावर सुनावणी होईल. नवीन नाव नोंदणीसाठी / वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह भरायचा आहे.

या कागदपत्रांची गरज

आधार, जन्म पुरावा, पत्त्याचा पुरावा,२०२५ च्या यादीतील तपशीलाचा स्क्रीनशॉट/फोटो, आणि एक पासपोर्ट फोटो.