बुलढाणा : महाराष्ट्रात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पिकांच्या मोठ्या नुकसानीमुळे भीषण दुष्काळाची स्थिती आहे. यामुळे लाखो शेतकरी व सामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळाची तीव्रता प्रचंड असल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आणि आगामी शेतीचे नियोजन कसे करावे, असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
शरद पवार संकरमोचक
या पार्श्वभूमीवर मेहकरचे माजी आमदार सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांना पत्र लिहून एक वेगळा उपाय सुचविला आहे. दुष्काळ निवारणासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे मार्गदर्शन घेण्याची मागणी त्यांनी रेटली आहे. देश व राज्यावरील विविध संकटाच्या काळात शरद पवार यांनी धिरोदात्त पणे कामगिरी बजावली आहे. त्यामुळे राज्यावरील कोरड्या दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणे काळाची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची ठाम मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कुंभामेळ्यापेक्षा दहा पट जास्त आर्थिक मदत देण्याची मागणी सावजी यांनी या त्रिमूर्तीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
विविध संकटाचा दाखला
शरद पवार यांनी यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून एका गावात ५० लाख रुपयांची मदत तत्काळ उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या याच संवेदनशीलता आणि संकट व्यवस्थापनाच्या अनुभवाचा दाखला देत सावजी यांनी शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे म्हटले आहे. शेतीचा उत्पादन खर्च, बियाणे, खते, मजुरी आणि सिंचनाचा खर्च पाहता एवढ्या रकमेतून शेतकऱ्यांच्या भीषण संकटावर मात करणे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना उद्भवलेल्या प्रसंगात असो, मुंबईतील दंगली व किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी शरद पवारांनी आपल्या दूरदृष्टीने संकट यशस्वीपणे हाताळले होते, याची आठवण या पत्रात करून देण्यात आली आहे.
बळीराजाला सिंहस्थापेक्षा जास्त मदत द्या
तसेच, नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचे नियोजन करत आहे. मात्र धार्मिक परंपरेइतकेच महाराष्ट्राच्या अन्नदात्याचे अस्तित्व टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनापेक्षा किमान दहा पट अधिक निधी शेतकऱ्यांसाठी वाटावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून हेक्टरी योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जवसुलीपासून दिलासा द्यावा, असेही पत्रात नमूद केले आहे.
