अकोला : महाराष्ट्रातील जिल्हानिहाय नाममात्र सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन (जीडीडीपी) वाढ दराच्या आकडेवारीनुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भातील दोन जिल्ह्यांनी प्रथम व द्वितीय स्थान पटकावले. विकास, शासन निधीसह विविध मुद्द्यांमध्ये नेहमीच दुर्लक्षित बुलढाणा जिल्हा प्रथम, तर आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्याने द्वितीय स्थान मिळवले. बुलढाण्याची २२.६, तर वाशीम जिल्ह्याची २१.० टक्के वाढ झाली. राज्यातील जिल्ह्यांच्या सरासरी वाढीपेक्षा दोन्ही जिल्ह्यांची वाढ मोठी व लक्षवेधी ठरली आहे.
राज्यात बुलढाणा प्रथम, तर वाशीम द्वितीय स्थानावर
महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२५-२६ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये जिल्हानिहाय नाममात्र सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन (जीडीडीपी) दराची आकडेवारी नमूद करण्यात आली. त्यानुसार सन २०२३–२४ च्या तुलनेत राज्यात सर्वाधिक वाढ बुलढाणा जिल्ह्यात २२.६ टक्के नोंदविण्यात आली असून त्यानंतर वाशीम जिल्हा २१.० टक्के वाढीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय नाशिक जिल्हा १८.२ टक्के, हिंगोली जिल्हा १७.९ टक्के आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा १६.८ टक्के वाढीसह पहिल्या पाचमध्ये आहेत.
यादीतील पहिल्या दहामध्ये विदर्भातील या दोन जिल्ह्यांचाच समावेश आहे. अकोला जिल्ह्याची वाढ ९.५ टक्के नोंदविण्यात आली. ६.७ टक्क्यांसह नांदेड जिल्हा सर्वात तळाशी आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजना सुरू असून त्याचा परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. तसेच कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढ, सेवा क्षेत्रातील संधी आणि उद्योजकता वाढ आर्थिक प्रगतीसाठी पोषक ठरत आहेत.
बहुतांश जिल्ह्यांची वाढ १० ते १३ टक्के
जिल्हानिहाय नाममात्र सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन (जीडीडीपी) वाढ दराच्या आकडेवारीनुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांची वाढ १० ते १३ टक्क्यांच्या दरम्यान आहे. पाच जिल्ह्यांची वाढ ही १० टक्क्यांपेक्षाही कमी दिसून येते. त्यामध्ये सिंधुदुर्ग ९.९ टक्के, अकोला ९.५ टक्के, परभणी ९.१ टक्के, अहिल्यानगर ८.७ टक्के आणि नांदेड ६.७ टक्के आहे.
सात जिल्ह्यांचाच ५४ टक्के वाटा
सकल राज्य देशांतर्गत उत्पादन हे राज्यातील सात जिल्हे मिळून सुमारे ५४ टक्के निर्माण केले जाते. त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्याचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या मोठे योगदान देणारे हे जिल्हे असल्याचे अहवालानुसार अधोरेखित होते.
