नागपूर: खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी संस्था स्तरांवरील फेरीत प्रवेश घेतल्यास त्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते.
अखेर राज्य शासनाने त्यांच्या शासन निर्णयात सुधारणा केली असून यापुढे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शेवटच्या फेरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजना लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग व कृषी विभागाच्या विविध अभ्यासक्रमांचा समावेश हा व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये केला जातो. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील विविध फेऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. प्रवेशाच्या सर्व फेऱ्या संपल्यावरही महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांवर प्रवेश हे संस्थास्तरावर होतात. हे प्रवेशही ‘प्रवेश फेरी’च्या अधीन राहून गुणवत्ता यादीनुसार घेतले जातात. मात्र, ही प्रवेश फेरी संस्थास्तरावर होत असल्याने या फेरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसंबंधित योजनांचा लाभ नाकारला जात होता.
त्यामुळे शेवटच्या फेरीत रिक्त असणाऱ्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र असतानाही शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे पूर्ण शुल्क भरून शिक्षण घ्यावे लागत होते. लोकसत्ताने अनेकदा या विषयाला वाचा फोडली आहे. अखेर शासनाने याची दखल घेतली असून आता शेवटच्या फेरीमध्ये आणि संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू राहील असा निर्णय घेतला आहे.
असा आहे नवीन शासन निर्णय
विद्यार्थ्यांनी शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील (कॅप) कोणत्याही फेरीद्वारे अथवा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या आणि संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ लागू राहील. तसेच, अशा सर्व विद्यार्थ्यांचा नवीन अथवा थेट द्वितीय अभ्यासक्रमांसाठीचा प्रवेश शासकीय केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारेच असणे आवश्यक आहे. या योजनेत पदव्युत्तर, पदवी या सदरात आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम, उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत चालवण्यात येणारे अभ्यासक्रम तसेच कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
