Maharashtra electricity crisis : नागपूर : राज्यात विजेची मागणी वाढलेली असताना तीन दिवसांपूर्वी महानिर्मितीचे तीन वीजनिर्मिती संच बंद पडले होते. त्यापैकी दोन संच सुरू झाल्याने दिलासा मिळत असतानाच आता चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्पातील आणखी दोन संच बंद पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्यावरील ताण कायम असून अधिकाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

उन्हाळ्यामुळे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोराडी प्रकल्पातील ६६० मेगावॅटचा संच क्रमांक ८, नाशिक केंद्रातील २१० मेगावॅटचा संच क्रमांक ४ आणि चंद्रपूर केंद्रातील ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ७ बॉयलर ट्यूब गळती आणि तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते. त्यापैकी नाशिक व चंद्रपूर येथील संच पुन्हा सुरू करण्यात यश आले असून कोराडीतील संचाची दुरुस्ती सुरू आहे.

दरम्यान, बुधवारी चंद्रपूर प्रकल्पातील २१० मेगावॅटचा संच क्रमांक ४ आणि ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ६ हे सुद्धा बॉयलर ट्यूब गळती वा अन्य तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. परिणामी, मागणीच्या तुलनेत वीज पुरवठ्यावर ताण कायम आहे. बुधवारी (२९ एप्रिल २०२६) दुपारी ३ वाजता राज्यातील विजेची मागणी २९,४९० मेगावॅट इतकी होती. त्यात मुंबईतील ३,९८० मेगावॅट मागणीचा समावेश होता. ही मागणी अचानक वाढल्यास राज्यातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांतून सर्वाधिक वीजनिर्मिती

राज्यातील एकूण मागणीपैकी सुमारे १८,१२० मेगावॅट वीजनिर्मिती महाराष्ट्रात होत आहे. त्यापैकी सर्वाधिक ७,४३७ मेगावॅट उत्पादन महानिर्मितीकडून होत आहे. यामध्ये औष्णिक प्रकल्पांतून ६,३२१ मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातून २६८ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ८४८ मेगावॅट आणि सौर ऊर्जेतून ७६ मेगावॅट वीजनिर्मितीचा समावेश आहे. खासगी क्षेत्रात जिंदल (९१०), अदानी (२,०७७), आयडियल (२३३), रतन इंडिया (१,३०७), बुटीबोरी (५६७) आणि एसडब्ल्यूपीजीएल (३०४ मेगावॅट) यांचे योगदान आहे. तसेच केंद्राच्या वाट्यातून राज्याला १२,१४६ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.

युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू – अनिल कथोये

वाढती मागणी लक्षात घेता चंद्रपूर प्रकल्पातील बंद पडलेल्या दोन संचांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. अधिकारी व कर्मचारी यासाठी कार्यरत असून लवकरच हे संच पुन्हा कार्यान्वित होतील, अशी माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता अनिल कथोये यांनी दिली. सध्या उपलब्ध इतर संचांतूनही समाधानकारक वीजनिर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, महावितरणच्या जनसंपर्क विभागाने मागणीच्या तुलनेत आवश्यक विजेचे नियोजन असून घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले.