नागपूर : राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या निर्मिती, पारेषण आणि वितरण या तीनही कंपन्यांमधील सुमारे ८६ हजार कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला आहे. तर विद्युत सहाय्यकांना १३ हजार रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे, कर्मचारी संघटनांनी २५ हजार रुपयांच्या बोनसची मागणी केली होती. मात्र, अखेर २० हजार रुपयांवर निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळाला आहे.
कोणाला किती बोनस मिळणार?
राज्याच्या तीनही वीज कंपन्यांमधील सुमारे ८६ हजार कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. विद्युत सहाय्यकांना १३ हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या खर्चासाठी मोठी मदत होणार आहे. या निर्णयाची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा आणि सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
बोनससाठी किती रुपयांची मागणी होती?
वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. याशिवाय महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या १८ संघटनांनीही बोनससाठी पाठपुरावा केला होता. अखेर २० हजार रुपयांचा निर्णय घेण्यात आला.
तीनही वीज कंपन्यांना किती नफा झाला?
वीज कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचा विचार करून बोनसचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला. २०२५-२६ या आर्थिक वर्षात महावितरणला १,२३४.१६ कोटी रुपये, महानिर्मितीला ४५१.९८ कोटी रुपये, तर महापारेषणला २,४३८ कोटी रुपयांचा नफा झाल्याचे संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. तीनही कंपन्यांच्या या आर्थिक कामगिरीमुळे कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या मागणीला बळ मिळाले.
बोनसचा निर्णय कसा झाला?
कामगार संघटनांनी मागणी केल्यानंतर तीनही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाने बोनसचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव संबंधित कंपन्यांच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर ऊर्जाविभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांसाठी २० हजार रुपये, तर विद्युत सहाय्यकांसाठी १३ हजार रुपये सानुग्रह अनुदान निश्चित करण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली.
कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा बोनसशी काय संबंध?
राज्यातील वीज ग्राहकांना सेवा देण्यासोबतच वीजपुरवठ्यातील सुरक्षितता वाढविणे, अपघात कमी करण्यासाठी प्रशिक्षण आणि उपाययोजना करणे, तसेच शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्याच्या कामात कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे संघटनेने म्हटले आहे. राज्यातील सौर कृषिपंप योजनेची जागतिक विक्रमात नोंद झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या कामगिरीमागे कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे परिश्रम असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
२५ हजारांची मागणी, २० हजारांचा निर्णय!
तीनही वीज कंपन्यांना झालेला नफा आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करता २५ हजार रुपयांच्या मागणीवर संघटना ठाम होती. मात्र, प्रत्यक्षात २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. तरीही दिवाळीपूर्वी बोनसचा निर्णय झाल्याने हजारो वीज कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
