वर्धा : १२वीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश घेण्याची गडबड सूरू होते. त्यातही अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश विशिष्ट प्रक्रियेतून सूरू होतात. त्याकडे इच्छुकांचे लक्ष लागून असते. तीच ही घडामोड.

अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी (Engineering) अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात (सीईटी-सेल) तर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी चार वर्षीय अभियांत्रिकी (BE/BTech) आणि पाच वर्षीय पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी (Integrated ME/MTech) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला (CAP Process) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार पात्र आणि इच्छुक विद्यार्थी २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज अचूक भरायचा आहे.

अर्ज शुल्क असे राहणार

या प्रवेश प्रक्रियेत खुल्या संवर्गातील (Open Category) विद्यार्थ्यांसाठी अर्ज शुल्क १ हजार ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. तर मागासवर्गीय संवर्गातील (Reserved Category) विद्यार्थ्यांसाठी १ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (कागदपत्र पडताळणी) आणि ऑनलाईन अर्ज कन्फर्मेशनची प्रक्रिया ३ जुलै ते १३ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशीही कागदपत्र पडताळणीचे काम सुरू राहणार आहे. विद्यार्थी सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निर्धारित केंद्रांवर किंवा ऑनलाईन पद्धतीने आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा, वेळापत्रक

  • प्रवेश नोंदणी – २ जुलै ते १२ जुलै २०२६
  • कागदपत्र पडताळणी व अर्ज निश्चिती – ३ जुलै ते १३ जुलै २०२६
  • तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) – १५ जुलै २०२६
  • गुणवत्ता यादीवरील आक्षेप/तक्रार नोंदवणे – १६ जुलै ते १८ जुलै २०२६
  • अंतिम गुणवत्ता यादी – (Final Merit List) २० जुलै २०२६

दोन परीक्षांच्या संधीचा फायदा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चालू शैक्षणिक वर्षात सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना दोन परीक्षांची (Two Attempts) संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांसह ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आता परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सीईटी सेलने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, अंतिम मुदतीची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी वेळेतच आपले अर्ज सादर करावेत आणि कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील कॅप राउंड्स (CAP Rounds) मध्ये कोणताही अडथळा येणार नाही.