नागपूर : जंगलातील वणवे रोखण्यासाठी जनतेने तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करणाऱ्या वनविभागानेच आपल्या टोल-फ्री क्रमांकात घोडचूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘हॅलो फॉरेस्ट’साठी सुरू करण्यात आलेल्या ‘१९२६’ या अधिकृत क्रमांकाऐवजी ‘१९६२’ असा चुकीचा क्रमांक प्रसिद्ध करत वनखात्यानेच गोंधळ उडवला आहे. वनविभागाच्या या निष्काळजीपणामुळे वणव्याविरोधातील यंत्रणा खरोखर किती सज्ज आहे, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
तत्कालीन वनमंत्र्यांचा पुढाकार
तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जानेवारी २०१७ मध्ये ‘हॅलो फॉरेस्ट’ या नावाने कॉल सेंटर सुरू केले. वनविभाग आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ व्हावा, हा यामागील उद्देश होता. त्यासाठी ‘१९२६’ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला. या पद्धतीने कॉल सेंटर सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. वणवा, वन्यप्राण्यांचा अपघात, अवैध वृक्षतोड आदीची माहिती या क्रमांकावर दिल्यास त्यावर त्वरित कार्यवाही होते. तत्कालीन वनमंत्री मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात या टोल फ्री क्रमांकाचा राज्याला फायदाच झाला. मात्र, अलीकडच्या काळात या क्रमांकाविषयी बऱ्याच तक्रारी येत आहे. कधी हा क्रमांक बंद असतो, तर कधी या क्रमांकावर प्रतिसाद मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
वनविभाग गंभीर नाही
अशातच आता राज्याच्या वनविभागाने अलीकडच्या चार-पाच दिवसांपासून समाजमाध्यमावर खात्याची प्रसिद्धी सुरू केली आहे. मात्र, ही प्रसिद्धी करताना ‘हॅलो फॉरेस्ट’च्या ‘१९२६’ या अधिकृत क्रमांकाऐवजी थेट ‘१९६२’ असा चुकीचा क्रमांक प्रसिद्ध करून गोंधळ उडवला आहे. वणव्यात राज्य आघाडीवर आहे आणि या मोसमात सर्वाधिक वणव्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्यानंतरही ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेतलेली नाही. वणव्याबाबत समाजमाध्यमांवर चक्क चुकीचा टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध केला आहे.
वनखात्याचे आवाहन फसवे
या जाहिरातीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. त्यानंतर खाली पुन्हा फडणवीस यांच्या छायाचित्रासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वनमंत्री गणेश नाईक यांचे छायाचित्र आहे. तर जाहिरातीत ‘वनवणवा रोखू या, वनसंपत्तीचे जतन करू या’ असे आवाहन करण्यात आले आहे. त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहे.
यात प्रामुख्याने सुका पालापाचोळा साफ करणे, वनक्षेत्रात गस्त घालणे, जंगलात किंवा त्याच्या आसपास शेतातील कचरा जाऊ नये, पेटलेली सिगारेट किंवा काडीपेटी जंगलात फेकू नये, जंगलात दोन भागांमध्ये रिकामी जागा जाळ रेषेसाठी ठेवणे, ज्यामुळे आग लागली तरी पसरणार नाही, अशा उपायांचा समावेश आहे. त्यासाठी दिलेला टोल फ्री क्रमांक मात्र चुकीचा दिला आहे.
