नागपूर : भारतीय पोलीस सेवा, भारतीय वनसेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेची कमाल पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या वनखात्याला भारतीय प्रशासकीय सेवेतील या महिला अधिकाऱ्याला सेवानिवृत्त करण्याची घाई झाली आहे. वनखात्याने चंद्रपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत या अधिकाऱ्याच्या नावासमोर चक्क ‘माजी’ हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. राज्याच्या वनखात्याने पहिल्यांदाच चंद्रपूर येथे ‘वनशक्ती २०२५’ ही महिलांची परिषद आयोजित केली आहे.
पाच आणि सहा जूनला आयोजित दोन दिवसीय परिषदेत देशभरातील वनखात्यातील आजी, माजी महिला अधिकारी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. तब्बल महिनाभरापासून या परिषदेचे नियाेजन सुरू आहे. या परिषद जागतिक पातळीवर गाजवायची असल्याने आयोजित चर्चासत्रात आमंत्रित करण्यात आलेले वक्तेही उच्चपदस्थ आणि जागतिक पातळीवर ओळख असणारे असेच नेमण्यात आले आहेत. मात्र, ही परिषद ग्लोबल करण्याच्या नादात आणि तब्बल महिनाभरापासून नियाेजन असताना देखील छापण्यात आलेल्या पत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या पदाचा घोळ करण्यात आला आहे.
वनक्षेत्रातील महिलांची ही पहिलीच राष्ट्रीय परिषद असल्याने उद्घाटनासाठी अर्थातच वनखात्याचे मंत्री गणेश नाईक येत आहेत. तर प्रमुख पाहुण्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, लोकसभा सदस्य नामदेव किरसान, लोकसभा सदस्य प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहेत. तर माजी वनमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किर्तीकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, वनखात्याचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, तेलंगणा वनबलप्रमुख श्रीमती सुवर्णा आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक विशेष पाहुणे आहेत.
राज्याचे मुख्य सचिव हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. सुजाता सौनिक या १९८७च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. राज्याच्या त्या वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांची सेवानिवृत्ती याच महिन्याच्या अखेरीस असली तरीही अजून काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. मात्र, राज्याच्या वनखात्याला कदाचित त्यांना वेळेच्या आधीच सेवानिवृत्त करण्याची घाई झाली आहे. ‘वनशक्ती २०२५’ या परिषदेसाठी छापलेल्या पत्रिकेत सुजाता सौनिक यांचा उल्लेख चक्क माजी मुख्य सचिव कसा करण्यात आला आहे. छापील पत्रिकेत हा घोळ लक्षात आल्यानंतर ‘माजी’ हा शब्द ‘व्हाईटनर’ लावून मिळवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे.