वर्धा : अलीकडे जंगल सफारीकडे लोकांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातही व्याघ्र सफारीवर लोकांच्या उड्या पडत आहे. सफारी बुकिंग फुल्ल, असे फलक नवे राहले नाही. हाच कल लक्षात घेत जागतिक व्याघ्र दिनी महाराष्ट्र वन विभाग व IRCTC ( Indian Railway Catering And Tourism Corporation ) म्हणजेच भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ यांच्यात या सफारीबाबत सामंजस्य करार झाला आहे.
सुट्टीतील जंगल सफारी
साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून जंगल सफारी सूरू होतात. ते डोळ्यापुढे ठेवून या सफारीचे वेळापत्रक ठरतील. भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी तर्फे खास वन्यजीव प्रेमीसाठी सर्वसमावेशक महाराष्ट्र सफारी पॅकेजसची आखणी केली आहे. ५ खास अश्या या सफारी राहणार. प्रत्येक पॅकेज हे ४ रात्री व ५ दिवसाचे राहणार. या ५ दिवसाच्या रोमांचक सफारीत पर्यटकांनी निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळणार.
विदर्भ विशेष म्हणून
महाराष्ट्रात व प्रामुख्याने विदर्भात देशातील काही व्याघ्र प्रकल्प हे सर्वोत्तम म्हटल्या जातात. पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटकांना ताडोबा – अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव यासारख्या प्रसिद्ध जंगलाना भेट देण्याची व वाघासाह इतर दुर्मिळ प्राण्यांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार. त्याची आखणी करतांना अन्य प्राणी असणाऱ्या जंगलांचा पण विचार होणार आहे.
पॅकेज विशेष असे
पर्यटक म्हणुन एकदा तुम्ही ईथे बुकिंग केले की प्रवासापासून ते राहण्याची सोय हे रेल पर्यटन महामंडळ करणार. त्यात काही सुविधा मिळणार. रेल्वे प्रवास तसेच रेल स्थानक ते हॉटेलपर्यंतची स्थानिक वाहतूक. जंगलालगत सुरक्षित, आरामदायी व निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये राहण्याची उत्तम सोय. सकाळचा नाश्ता, दुपार व रात्रीचे दर्जेदार जेवण. सर्वात महत्वाचे म्हणजे सफारीचे तिकीट. पण या पॅकेजमध्ये सफारीचे परवाने, अनुभवी गाईड व जीप्सीची सर्व व्यवस्था हे महामंडळच करणार. या पॅकेजची संपूर्ण माहिती IRCTC च्या पर्यटन वेवसाईटवर उपलब्ध आहे.
मानद वन्यजीव रक्षक म्हणतात
मध्य रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य व मानद वन्यजीव रक्षक प्रणव सुरेंद्र जोशी हे सांगतात की जागतिक व्याघ्र दिनी IIM नागपूर येथे महाराष्ट्र वन विभाग आणि IRCTC लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत झालेला करार अत्यंत स्वागतार्ह आहे. या उपक्रमामुळे ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट, टिपेश्वर, उमरेड-पौनी-कऱ्हांडला तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना देश-विदेशातील पर्यटक अधिक मोठ्या प्रमाणात भेट देतील..IRCTC चे पर्यटन व्यवस्थापन आणि भारतीय रेल्वेचे विस्तृत नेटवर्क यामुळे पर्यटकांना प्रवास व निवासाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. यामुळे विदर्भातील व्याघ्र पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल. हा करार विदर्भाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवून देणारा ठरेल, असा विश्वास आहे.
