वर्धा : राज्यातील ११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्या दृष्टीने वेळोवेळी सूचना देण्यात येत असतात. आता ही सूचना अत्यंत महत्वाची अशी आहे.

विशेष फेरी अशी राहणार

महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ११ वीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (FYJC 2026-27) बहुप्रतिक्षित ‘विशेष फेरी १’ (Special Round 1) चे सविस्तर वेळापत्रक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २५ जून २०२६ रोजी यासंबंधीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले असून, ही फेरी सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी खुली असेल.

जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, अर्ज भाग-१ मधील दुरुस्ती करणे आणि विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम अर्ज (भाग-२) भरणे यासाठी २१ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपासून प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ०१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत.

विविध कोटा प्रवेश

याच कालावधीत इन-हाउस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम ऑनलाइन नोंदवून अर्ज लॉक करणे बंधनकारक आहे.अशी असेल पुढील प्रवेश प्रक्रिया. अलॉटमेंट प्रोसेस (गुणवत्ता यादी तयार करणे)- अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ०२ जुलै ते ०३ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार कॉलेज अलॉटमेंटची प्रक्रिया चालेल.

विशेष फेरी-१ वाटप यादी

०३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता विद्यार्थ्यांना कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे, याची वाटप आणि कट-ऑफ यादी पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. सोबतच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे देखील याबाबतची माहिती दिली जाईल. याच वेळी कोटा अंतर्गत प्रवेशाची गुणवत्ता यादी महाविद्यालयांच्या लॉगिनवर प्रसिद्ध होईल.

महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे बाबत असे. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजचे वाटप झाले आहे आणि जे प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत, त्यांनी ०३ जुलै २०२६ दुपारी ४:०० वाजेपासून ते ०६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून, कागदपत्रांची पडताळणी करून व विहित शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे.

विशेष फेरी-१ मधील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर.०६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्यानंतर ०७ जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या स्तरावरील डेटा प्रोसेसिंगचे काम पूर्ण करावे लागेल. तर ०८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

वेळापत्रकनुसार अशी कार्यवाही

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालकांनी दिलेल्या मुदतीतच पूर्ण करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर कोणत्याही स्तरावर वेळ वाढवून दिली जाणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत आपले पसंतीक्रम अर्ज लॉक करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.