नागपूर : राज्यात करोना संसर्ग वाढल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत होणाऱ्या बैठकींवर घातलेली बंदी करोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य शासनाने उठवली आहे. त्यामुळे पुढच्या काळात ऑनलाइन ऐवजी सामाजिक अंतर राखून या बैठका महापालिका, नगरपालिकांना घेता येणार आहेत.  राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात नुकतेच आदेश काढले आहेत.

करोनामुळे महापालिका, नगरपालिका किंवा नगर पंचायतीमध्ये नगरसेवकांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठका बंद झाल्या होत्या. त्याऐवजी त्या ऑनलाइन स्वरूपात होत होत्या. मात्र तांत्रिक कारणांमुळे किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकांचा त्यातील सहभाग अत्यल्प स्वरूपात राहात होता. अनेक नगरसेवक तर बैठकांमध्ये सहभागीच होत नसत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसाधारण सभा, विशेष सभा नगरसेवकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात हे येथे उल्लेखनीय. सध्या करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने टप्प्याटप्प्याने सर्व प्रतिबंध शिथिल करण्यात आले असून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भात दिलेल्या सूचनांच्या आधारे नगरविकास विभागाने महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतींना पत्र पाठवून सुरक्षित अंतर राखून सदस्यांच्या सभा प्रत्यक्ष स्वरूपात घेण्यास परवानगी दिली आहे. विभागाचे अतिरिक्त सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी २२ ऑक्टोबरला आदेश काढले आहेत. त्यामुळे पुढच्या काळात महापालिका, नगरपालिकांमधील सभा आता ऑनलाइन ऐवजी नगरसेवकाच्या उपस्थितीत होतील.