अमरावती: राज्यातील विविध शासकीय विभागांकडील कंत्राटदारांची हजारो कोटी रुपयांची देयके दीड वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करीत कंत्राटदारांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रलंबित देयकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कंत्राटदारांनी अनोख्या पद्धतीने फलक लावून सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे. फलकांवर एक शोक संदेश लिहण्यात आला आहे.
कंत्राटदारांचे म्हणणे काय?
सरकारचे प्रतीकात्मक निधन झाल्याचे जाहीर करीत कंत्राटदारांनी चक्क शोकसंदेशाचे फलक लावले आहेत. या फलकांची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय तसेच जिल्हा परिषद मुख्यालयाच्या परिसरात आणि पंचवटी चौकात हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवरील मजकुराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘महाराष्ट्र सरकारचे १९ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन झाले आहे २ नोव्हेंबरला तेरवी आहे’, अशा आशयाचे शोकसंदेश या फलकांवर लावण्यात आले आहेत.
कंत्राटदार झाले कर्जबाजारी
अनेक महिन्यांपासून देयके प्रलंबित असल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कामासाठी घेतलेले कर्ज, साहित्य पुरवठादारांची देणी, मजुरांचे वेतन आणि इतर आर्थिक व्यवहार सांभाळताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे शासन विकासकामे करण्याचे निर्देश देते, तर दुसरीकडे पूर्ण झालेल्या कामांचा निधी उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याचा आरोप कंत्राटदारांकडून केला जात आहे.
कोट्यवधींची देयके रखडली
सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे २७ हजार कोटी रुपये, जलजीवन मिशनची ३८ हजार कोटी रुपये, आदिवासी विभागाची १२ हजार कोटी रुपये, ग्रामविकास विभागाची ३५०० कोटी रुपये आणि पर्यटन विभागाची २५०९ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. याशिवाय जलसंपदा, जलसंधारण आणि नगरविकासासह अन्य विभागांकडील देयकेही रखडली आहेत. या थकबाकीमुळे राज्यातील सुमारे तीन लाख कंत्राटदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कोट्यवधी घटकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याचा दावा कंत्राटदार संघटनांनी केला आहे.
दहा कंत्राटदारांची आत्महत्या
गेल्या वर्षभरात सुमारे नऊ ते दहा कंत्राटदारांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचेही संघटनांनी म्हटले आहे. या गंभीर प्रश्नावर वारंवार आंदोलने, धरणे आणि मोर्चे काढण्यात आले. मंत्रालयात संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची भेट घेऊनही ठोस निर्णय झाला नसल्याची खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घ्यावी, अशी विनंती करूनही वेळ मिळालेला नसल्याचा आरोप आहे.
