वर्धा : काही विशेष उपक्रम चांगलेच चर्चेत असतात. त्यास प्रोत्साहन देणारे मग हा उपक्रम व्यापक पातळीवार अंमलात यावा यासाठी प्रयत्न करतात. तसेच ईथे. आमदार असतांना व नंतर मंत्री झाल्यावर शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी बाल विज्ञान प्रदर्शनी राबविण्यात पुढाकार घेतला. जिल्हा नियोजन मंडळातून त्यासाठी निधी पण मिळवून दिला. त्यास भरघोस यश मिळाले. जिल्ह्यातील विद्यार्थी विविध विज्ञान केंद्रात जाऊन आले. परत येताच या बाल वैज्ञानिक यांचे पंच तारांकित हॉटेलमध्ये पायघडया घालून स्वागत करण्यात आले होते. हा लाभ केवळ एकाच जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थी वैज्ञानिकांना मिळावा म्हणून डॉ. भोयर यांनी प्रयत्न सूरू केले. मुख्यमंत्र्यंना गळ घातली. आज तसा आदेश अखेर निघाला आहे.

विज्ञान वारी

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातील संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ६ मे २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून, याद्वारे राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील निवडक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान केंद्रांना भेटी देण्याची संधी मिळणार आहे.

उपक्रमाची पार्श्वभूमी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मधील तरतुदींनुसार विज्ञान शिक्षणाला अधिक प्रगल्भ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पारंपारिक शिक्षणापलीकडे जाऊन अनुभवाधारित शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल लॅब्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या यशाच्या स्तरानुसार तीन विभागांत भेटींचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुका स्तर (विभागीय सायन्स सेंटर भेट)

तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या एकूण २१४८ विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या विभागीय सायन्स सेंटरला (उदा. रमण सायन्स सेंटर-नागपूर, पिंपरी-चिंचवड सायन्स सेंटर-पुणे किंवा नेहरू तारांगण-मुंबई) भेट दिली जाईल. यासाठी प्रति विद्यार्थी कमाल २०,००० रुपये खर्च अपेक्षित आहे.

जिल्हा स्तर (इस्रो – ISRO भेट)

जिल्हा स्तरावरील प्रदर्शनातून निवड झालेल्या सर्वसाधारण, दिव्यांग आणि आदिवासी गटातील एकूण १८० विद्यार्थी आणि ८ पर्यवेक्षकांना बंगळुरू येथील इस्रो (ISRO) केंद्राला भेट देण्याची संधी मिळेल. या भेटीसाठी प्रति व्यक्ती ३५,००० रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राज्य स्तर (नासा – NASA भेट)

या उपक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे राज्य स्तरावरील उत्कृष्ट  ५१ विद्यार्थ्यांची थेट अमेरिकेतील नासा (NASA) केंद्राच्या भेटीसाठी झालेली निवड होय. या ८ दिवसांच्या परदेश दौऱ्यासाठी विमान प्रवास, व्हिसा आणि निवासासह प्रति व्यक्ती ६ लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. एकूण ५५ व्यक्तींच्या या दौऱ्यासाठी शासनाने ३.३० कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

निवड प्रक्रिया

विज्ञानाच्या या ‘वारी’साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी, जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य स्तरावर संचालक (SCERT) यांच्या अध्यक्षतेखालील समित्या या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतील. यामध्ये उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी ते ८ वी) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता ९ वी ते १२ वी) अशा दोन गटांतून विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील वैज्ञानिक प्रगती जवळून पाहता येणार आहे, ज्यामुळे भविष्यात राज्यातून नवे शास्त्रज्ञ घडण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला.