बुलढाणा : राज्य शासनाच्या अख्त्यारितील शासकीय, निमशासकीय कार्यालयात आता तक्रार पेटी च्या धर्तीवर ‘अभिप्राय पेटी’ राहणार आहे. या पेटीत कार्यालयात येणाऱ्या नागरिक, लाभार्थी एवढेच नव्हे कर्मचाऱ्याना सुद्धा आपले अभिप्राय नोंदविण्यात येणार आहे.

दर महिन्याच्या ठराविक तारखेला ही पेटी उघडण्यात येणार असून त्यावर कार्यालय प्रमुख अंमलबजावणी करणार असून संबंधित विभागाच्या सचिवाना अहवाल सादर करणार आहे. त्यावर राज्य शासनही निर्णय घेणार आहे.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थाना अभिप्राय पेटी योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील सुचना राज्याच्या प्रधान सचिवाकडून देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये सुचना किंवा तक्रार पेटी ठेवण्याची पद्धत पूर्वीपासुन अस्तित्वात आहे. मात्र याचा कार्यालय कामकाजाबाबत सुधारणेच्या दृष्टीने फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे अभिप्राय पेटी ची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. लोकाभिमुख, पारदर्शक, उत्तरदायी व कार्यक्षम प्रशासन निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.

पुरविल्या जाणाऱ्या सेवामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी, मिळणारी मदत, कार्यालयीन वातावरण, अधिकारी व कर्मचारी यांची वर्तणूक, कामकाजातील सुलभता किंवा विलंब याबाबतचा त्यांचा अनुभव ‘अभिप्राय’ मधून उमटणे अपेक्षित आहे. कर्मचारी देखील आपल्या विभागातील कामकाज अधिक चांगले होण्यासाठी आपले अभिप्राय देऊ शकतील. नागरिकांच्या अनुभवांच्या प्रशासनाला आत्मपरीक्षणाची संधी मिळेल, शासकीय कामकाजात गतिमानता, सुलभता व गुणवत्ता वाढीस लागेल, असा यामागचा प्रशासकीय आशावाद आहे.

अशी आहे कार्य पद्धती

कार्यालयामध्ये नागरिकांसाठी विहीत नमुन्यातील अभिप्राय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कागदावर लिहून अभिप्राय देण्याचा पर्याय सुद्धा आहे. कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी कुलूपबंद अभिप्राय पेटी ठेवण्यात येणार आहे. अभिप्राय मध्ये कार्यालयीन स्वच्छता, सेवा पद्धत, नागरिकांशी वागणूक, कामकाजातील सुलभता, या मुद्द्यांवर १ ते ५ इतके गुणांकन सादर करता येईल.

तसेच त्यांना आलेल्या अनुभवांवर मुक्त स्वरूपात त्यांचे अभिप्राय नोंदवून सदर अभिप्राय कुलूपबंद पेटीमध्ये टाकण्याची मुभा देखील राहणार आहे. कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा लोकाभिमुख प्रशासनासाठी मते मांडू शकणार आहे. विकासात्मक व प्रशासकीय दृष्टीने शासकीय योजनांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत याबाबत आपले अभिप्राय या यंत्रणेद्वारे देऊ शकतील.

पाच तारखेला उघडणार पेटी

अभिप्राय पेटी दरमहा ५ तारखेला, सुट्टी असल्यास पुढील दिवशी कार्यालय उघडण्यात येणार आहे . प्राप्त अभिप्रायांचे वाचन करून संकलन करण्यात येणार आहे. त्याची नोंद अभिप्राय नोंदवहीमध्ये घेण्यात येणार आहे. कार्यालय स्तरावर अंमलतबजावणी करता येणारे आणि धोरण नियम संदर्भातील अभिप्राय अशा दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येईल.

कार्यालय स्तरावर तात्काळ अंमलात आणता येणाऱ्या उपयुक्त सुचनांची अंमलबजावणी संबंधित कार्यालय प्रमुखांनी तात्काळ करावी. नियम, कार्यपद्धती अथवा धोरणांमध्ये बदल साठीचे अभिप्राय वरिष्ठ कार्यालय व संबंधित विभागाचे सचिव तसेच सचिव (प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता व सुशासन) यांना पाठवावी असे निर्देश देण्यात आले आहे अशा प्रस्तावांवर शासन स्तरावर विचार करून आवश्यक ते निर्णय घेता येतील.