नागपूर : दिवाळी सण काहीच दिवसांवर आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळीचा गोडळवाच हरवला. तर उत्पादनचे कमी होणार असल्याने अनेक वस्तू महागल्यात. त्याचा परिणामही दिवाळीवर होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भरीव मदतीची मागणी होत आहे. दुसरीकडे कर्मचार्‍यानी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. नागपूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने केली आहे. यासंदर्भात महासंघाचे अध्यक्ष संजय धोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

या दिवशी हवी सुट्टी

यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन पाहता ९ नोव्हेंबर हा एकमेव दिवस कार्यालयीन कामकाजाचा राहणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी रविवार आणि लक्ष्मीपूजन आहे. त्यानंतर १० नोव्हेंबरला बलिप्रतिपदा, तर ११ नोव्हेंबरला भाऊबीज असल्याने या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे मधल्या ९ नोव्हेंबरला शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. मात्र, या एका दिवसामुळे कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

राज्यातील विविध शासकीय विभागांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये हजारो अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अनेक कर्मचारी नोकरीच्या निमित्ताने आपल्या मूळ गावापासून दूर राहतात. दिवाळी हा कुटुंबीयांसोबत साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण असल्याने प्रत्येकाला आपल्या गावी जाऊन सण साजरा करण्याची इच्छा असते. मात्र, केवळ एका दिवसाच्या कार्यालयीन उपस्थितीसाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा कामावर परतणे आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या गैरसोयीचे ठरणार आहे. महासंघाच्या म्हणण्यांनुसार, ९ नोव्हेंबरला कार्यालये सुरू राहिल्यास अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी गावी जाणे शक्य होणार नाही. परिणामी, त्यांना कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. तसेच या दिवशी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने कर्मचारीहिताचा विचार करून सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे.

सलग चार दिवस सुट्ट्यांचा लाभ

९ नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यास ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही घाई न करता आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद घेता येईल. आता कर्मचारी महासंघाच्या या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासन काय निर्णय घेणार, याकडे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.