नागपूर : अफगाणिस्तानमधील बमियान बुद्ध मूर्ती या प्राचीन जगातील एक अद्वितीय सांस्कृतिक वारसा मानल्या जात होत्या. मध्य अफगाणिस्तानातील बमियान खोऱ्यात, काबूलपासून सुमारे २३० किलोमीटर वायव्येला, डोंगराच्या उभ्या कड्यात कोरलेल्या बुद्धाच्या दोन विशाल मूर्ती येथे उभ्या होत्या. यांपैकी एक मूर्ती सुमारे ५५ मीटर तर दुसरी सुमारे ३८ मीटर उंच होती. इ.स. पाचव्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान या मूर्तींची निर्मिती झाली असून त्या काळात बमियान हे बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र होते. या मूर्ती गांधार कला शैलीचा उत्कृष्ट नमुना होत्या. डोंगरात कोरीव काम करून त्यावर माती, चुन्याचा थर व रंगकाम करण्यात आले होते.
मूर्तींभोवती अनेक बौद्ध विहार, गुहा व भित्तिचित्रे होती, ज्यांमधून त्या काळातील धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडत होते. बमियान खोरे हे रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे विविध संस्कृतींचा आणि धर्मांचा संगम झाल्याचेही दिसून येते. मार्च २००१ मध्ये तालिबानने या मूर्ती इस्लामविरोधी असल्याचे कारण देत स्फोटके व तोफांच्या सहाय्याने नष्ट केल्या.
या घटनेमुळे संपूर्ण जगात तीव्र निषेध व्यक्त झाला आणि मानवजातीच्या सांस्कृतिक वारशावर झालेला हा मोठा आघात मानला गेला. पुढे २००३ मध्ये बमियान खोरे आणि त्यातील अवशेषांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले. आज जरी बमियानच्या बुद्धमूर्ती अस्तित्वात नसल्या, तरी त्यांच्या रिकाम्या कोनाड्यांतून त्या वैभवशाली इतिहासाची साक्ष मिळते. आता बमियानची मूर्ती नागपुरात बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्न
नागपूरमध्ये बमियान येथील बुद्ध प्रतिमेची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव आहे. अफगाणिस्तानातील बमियान येथे असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या ऐतिहासिक प्रतिमेच्या विध्वंसाला २५ वर्षे पूर्ण होत असतानाच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिकृती नागपूरमध्ये स्थापन करण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल यासुशी इझुमी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान हा प्रस्ताव मांडला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे याच शहरात बमियान येथील भगवान बुद्धांच्या प्रतिमेची प्रतिकृती उभारण्यास विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यांनी हेही नमूद केले की तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात जपानचा वाकायामा प्रांत गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सरकारसोबत सहकार्य करत आहे. ‘सिस्टर स्टेट’ कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतामध्ये अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले असून, हे संबंध भविष्यात अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

