नागपूर : आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी (गट ब) संवर्गातील ३१ अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांची यादी शासनाने जाहीर केली. दुसरीकडे, १४३ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीसंदर्भातील समुपदेशनाची यादी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप समूहांवर प्रसारित झाली आहे. दोन्ही याद्यांत १८ अधिकाऱ्यांची नावे समान असून काही अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळी बदलीस्थळे नमूद आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी नेमके कुठे रुजू व्हावे, याबाबत संभ्रम असून संपूर्ण बदली प्रक्रिया वादत सापडली आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागाने २१ मेदरम्यान वैद्यकीय अधिकारी (गट ब) संवर्गाच्या बदलीसाठी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी प्रत्येक अधिकाऱ्याकडून पसंतीची ठिकाणे जाणून घेण्यात आली आणि उपलब्ध जागांनुसार संभाव्य बदलीस्थळांची माहिती देण्यात आली. समुपदेशनानंतर बदली यादी तातडीने जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. दरम्यान, समुपदेशनाची यादी मंत्रालयातून ‘लीक’ झाल्याचा दावा करण्यात येत असून ती विविध व्हॉट्सॲप समूहांवर प्रसारित झाली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांची संभाव्य बदलीस्थळे नमूद करण्यात आली होती. त्यानंतर २७ मे २०२६ रोजी शासनाने विनंती बदल्यांची स्वतंत्र यादी जाहीर केली.

विनंती बदलीच्या यादीतील १८ अधिकाऱ्यांची नावे प्रशासकीय बदलीच्या प्रसारित यादीतही आढळून आली आहेत. त्यापैकी काही अधिकाऱ्यांना दोन्ही याद्यांमध्ये वेगवेगळी बदलीस्थळे दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात कार्यरत असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आईची प्रकृती गंभीर असून त्यांना वारंवार रुग्णालयात न्यावे लागते, तर औरंगाबाद येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भावाला मानसिक आजार असून त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर आहे. असे असतानाही दोघांचाही विनंती बदलीसाठी विचार केला गेला नाही. त्यामुळे बदली प्रक्रियेच्या निकषांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोग्य मंत्र्यांकडून प्रतिसाद नाही

याप्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्याशी भ्रमणध्वनी व लघुसंदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. अवर सचिव ऋषीराज कदम यांनी हे आरोप फेटाळले. कदम म्हणाले, विनंती बदल्यांची यादी जाहीर झाली असली तरी प्रशासकीय बदल्यांची अंतिम यादी अद्याप प्रसिद्ध नाही. मंत्र्यांच्या मंजुरीनंतरच ती जारी केली जाते. या यादीत विनंती बदलीतील बहुतांश नावे नसतील. एखाद्याचे नाव असल्यास शासन त्यावर निर्णय घेईल.

विनंती बदलीची अधिकृत यादी आणि ‘व्हॉट्सॲप’वर प्रसारित झालेल्या प्रशासकीय बदलीच्या यादीतील नावे व बदलीस्थळे पाहता अनेक विसंगती आढळतात. या त्रुटी तातडीने दूर करण्याची गरज आहे. कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यावर अन्याय होता कामा नये. – डॉ. अरुण कोळी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघ.