बुलढाणा : सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्या दरवर्षी चर्चेचा आणि कधी कधी वादाचा विषय ठरतात. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-ब, गट-क आणि गट-ड कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रियेला गती देत स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याशिवाय बदल्यांचे महत्त्वपूर्ण वेळापत्रकही जाहीर केले गेले आहे.

बदल्यांची कार्यपद्धती निश्चित

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुसूत्र करण्यावर भर दिला गेला आहे, असे विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १५ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, समुपदेशनाद्वारे सर्वसाधारण बदल्या करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संचालक, आरोग्य सेवा यांनी राज्यातील आठ परिमंडळांतील सर्व कार्यक्रम प्रमुखांच्या बदल्यांसाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक निश्चित केले आहे.

जाहीर झाले वेळापत्रक

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार रिक्त पदांची यादी ६ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झाली. बदलीपात्र कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी ८ मे रोजी जाहीर करण्यात आली. तसेच प्रपत्र १ ते ५ तयार करून १० मे रोजी नागरी सेवा मंडळासमोर सादर करण्यात आले. नागरी सेवा मंडळाकडून समुपदेशनाद्वारे बदल्यांचे अंतिम प्रस्ताव १५ मेपर्यंत पाठविण्यात येणार असून, अंतिम बदली आदेश ३१ मे रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील.

चार निरीक्षकांची नजर

दरम्यान, संपूर्ण बदली प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या धोरणानुसार बदल्या करताना सेवा कालावधी, प्राधान्यक्रम, पसंतीक्रम, प्रशासकीय गरज तसेच दुर्गम भागातील सेवेला विशेष महत्त्व देण्यात येणार आहे. याशिवाय अपंग कर्मचारी, गंभीर आजारांनी ग्रस्त कर्मचारी, विधवा महिला, पती-पत्नी एकत्रीकरण आणि शैक्षणिक कारणे यांसारख्या मानवी बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

हस्तक्षेप सहन केला जाणार नाही

बदली प्रक्रिया पूर्णपणे प्रशासकीय आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार असून, कोणत्याही प्रकारचा बाह्य दबाव अथवा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.