राज्यात करोना नियंत्रणात आहे. लोकांना आग्रह नाही, पण त्यांनी करोनाविरोधात लढणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) तपासून तिसऱ्या डोससंदर्भात निर्णय घ्यावा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. नागपुरातील रवी भवन येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राजेश टोपे नागपूर दौऱ्यावर असून डागा आणि मेंटल हॉस्पिटलला भेट देणार आहेत.

“करोना नियंत्रणात आहे. रिकव्हरी टक्केवारी ९८ टक्क्यांवर आहे. लसीकरणाचे चांगले परिणाम दिसत आहेत. रुग्ण जास्त नसल्याने फार मोठा विषय नाही, चौथ्या लाटेची काळजी करण्याची गरज नसल्याचंही,” राजेश टोपे म्हणाले.

“ग्रामीण भागात जाऊन काम केले पाहिजे असे शरद पवारांचे आदेश आहेत. काटोलमध्ये जाऊन ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रविषयक काम पूर्ण झाले, जिल्हा रुग्णालयाची इमारत झाली आहे. विदर्भाचे मुख्यालय म्हणून ते कसे लवकर कार्यान्वित होईल यासाठी पाऊलं उचलणार आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संभाजीराजेंवर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, “आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. संभाजीराजेंबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे. पूर्वी ते राष्ट्रवादी पक्षाचे जवळचे सहकारी होते. आम्ही त्यांना लोकसभेची उमेदवारीदेखील दिली आहे. शरद पवारांशी, आमच्याशी सर्वांशी त्यांचे संबंध प्रेमाचे, आपुलकीचे आहेत. पक्षश्रेष्ठी आणि महाविकास आघाडी यासंदर्भातील स्पष्ट निर्णय घेतील”.

१०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कारागृहात असलेले माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघांत अलिकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे दौरे वाढले. काही दिवसांपूर्वी रोहित पवार येऊन गेले, त्यापूर्वी अमोल मिटकरी यांचा दौरा झाला. सोमवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली.

काटोलवर एवढी मेहरनजर का? असा प्रश्न टोपे यांना केला असता ते म्हणाले की, “काटोल मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अनिल देशमुख हे वरिष्ठ मंत्री राहिले आहेत. विकासाला खीळ बसू नये यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे”.

“निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप आमदार आशिष जयस्वाल यांनी केला आहे. मतदारसंघाचे ते वरिष्ठ आमदार आहेत, ते माझे मित्र आहेत. त्यांच्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे ही महाविकास आघाडीची जवाबदारी आहे, तो आम्ही करूच,” असं राजेश टोपेंनी सांगितलं.