नागपूर : महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत राज्य महामार्गांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवर अपघात आणि अपघाती मृत्यू जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे. जानेवारी २०२६ या एकाच महिन्यात राज्यातील दोन्ही महामार्गांवर एकूण ७७६ अपघाती मृत्यू झाल्याची माहिती अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून दिली.

केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी अपघात नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा केला जात असला तरी अपघात होत आहे. महाराष्ट्रातील राज्य महामार्गांवर २०२४ मध्ये ५ हजार ८१४ अपघात झाले. त्यात ३ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला होता. २०२५ मध्ये ५ हजार ६४८ अपघातांत ३ हजार ९० जणांचा मृत्यू, तर नवीन वर्षातील जानेवारी २०२६ मध्ये ५२५ अपघातांत २८४ जणांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात

राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर २०२४ मध्ये ११ हजार २८५ अपघातांत ५ हजार ८१२ जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये ११ हजार २४१ अपघातांत ५ हजार ७९४ जणांचा मृत्यू, तसेच जानेवारी २०२६ या एकाच महिन्यात ९७८ अपघातांत ४९२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.

महामार्गावरील अपघाताची तुलना

राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग यांची तुलना केल्यास, राज्य महामार्गांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांवर जवळपास दुप्पट अपघात आणि अपघाती मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते.

समृद्धी महामार्गावर ४४४ मृत्यू

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ४९१ अपघात झाले. त्यात ४४४ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.

महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या सातपट

राज्यात १ जानेवारी २०२१ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण १ लाख ७३ हजार ७७१ गंभीर व किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले. त्यात ८ हजार ८४७ महिला आणि ६७ हजार ८३७ पुरुषांचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूंची संख्या सातपटहून अधिक असल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे.

वेग, निष्काळजीपणा आणि नियमभंग ठरताहेत अपघातांचे कारण

राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपघातांच्या वाढत्या संख्येमागे वेगमर्यादेचे उल्लंघन, बेफिकीर वाहनचालक, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अपुरी दुरुस्ती, अपुरे प्रकाशयोजन, तसेच धोकादायक वळणे आणि फाटेही अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. दीर्घ पल्ल्याच्या महामार्गांवर थकवा येऊन चालकांची एकाग्रता कमी होते, त्यामुळेही गंभीर अपघात घडत असल्याचेही निरीक्षण वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नोंदवले जातात.