नागपूर : राज्याच्या गृह विभागाने प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलातील अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश नुकतेच काढले. पोलीस स्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला. या नव्या आदेशांमुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई यांसारख्या प्रमुख महानगरांच्या पोलीस प्रशासनात मोठे बदल होणार आहेत.
या नव्या रचनेनुसार नागपूर येथे कार्यरत शिवाजी राठोड यांची आता ठाणे शहर येथे अपर पोलीस आयुक्त पदावर वर्णी लागली आहे. तसेच पुणे एटीएस (ATS) मध्ये असलेले प्रमोद शेवाळे यांची नवी मुंबई गुन्हे शाखा येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. याव्यतिरिक्त विनीता साहू यांच्याकडे एसआरपीएफ मुंबई उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार देण्यात आला. अशोक दुधे हे ठाणे शहर येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. आर. राजा यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची नियुक्ती मुंबई अपर पोलीस आयुक्त या पदावर झाली आहे.
विविध शहरांमधील उपायुक्त आणि अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील जाहीर झाल्या आहेत. शीला साईल यांना मुंबई शहरात पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली. तर बाळासाहेब पाटील, विवेक पानसरे आणि निलेश सोनावणे या अधिकाऱ्यांना ठाणे शहरात पाठवण्यात आले आहे. समुद्र किनारपट्टी विभागासारख्या संवेदनशील ठिकाणी श्रीकांत परोपकारी यांची नियुक्ती झाली आहे, आणि रविंद्र परदेशी हे पुणे एसआरपीएफ गट-१ चे समादेशक म्हणून सूत्रे हाती घेतील. ग्रामीण भागाचा विचार करता प्रकाश जाधव यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. विनय राठोड यांची ठाणे ग्रामीण तर संभाजी कदम यांची पुणे एटीएस येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. विवेक पाटील हे आता पुणे सीआयडी ची जबाबदारी सांभाळतील.
इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये संजय सरगुंडा पाटील आणि अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. विक्रांत देशमुख हे पिंपरी-चिंचवड येथे रुजू होतील. प्रिती टिपरे यांना अन्न आणि औषध प्रशासन (FDA) मुंबई मध्ये सहआयुक्त पदावर नियुक्त केले गेले आहे. पुणे येथील नार्कोटिक्स टास्क फोर्सची धुरा हिंमत जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, काही प्रशासकीय कारणास्तव कुमार चिंथा, नित्यानंद झा, अकबर पठाण आणि दिपक गिऱ्हे यांच्या आधी काढलेल्या बदली आदेशांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
