नागपूरः राज्यातील कारागृहांची दारे बंदिवानांसाठी अपुरी पडू लागली आहेत. अधिकृत क्षमता केवळ २७ हजार ५०४ असताना तब्बल ४० हजार ४१२ बंदी कारागृहांत आहेत. धक्कादायक म्हणजे, प्रत्येक १०० जागांमागे १४७ बंदी असून राज्यातील नऊही मध्यवर्ती कारागृहे क्षमतेपेक्षा अधिक भरली आहेत. कोणत्या कारागृहात तिप्पट, तर कुठे अडीचपट गर्दी आहे?
राज्यातील कारागृहांमध्ये किती बंदी आहेत?
मध्यवर्ती, जिल्हा, विशेष आणि महिला कारागृहांची एकत्रित अधिकृत क्षमता २७ हजार ५०४ आहे. मात्र, ३१ जुलै २०२६ रोजी प्रत्यक्षात ४० हजार ४१२ बंदी होते. म्हणजेच क्षमतेपेक्षा १२ हजार ९०८ बंदी अधिक आहेत. प्रत्यक्ष बंदीसंख्या क्षमतेच्या १४६.९ टक्के असून निर्धारित क्षमतेपेक्षा गर्दीचे प्रमाण ४६.९ टक्के अधिक आहे.
ही माहिती कशी समोर आली?
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थुल यांनी मागितलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली. गृह विभागाच्या कारागृह व सुधारसेवा विभागाचे जनमाहिती अधिकारी रंगनाथ गुंजाळ यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी ही आकडेवारी दिली.
कोणत्या कारागृहाची स्थिती सर्वाधिक गंभीर?
मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ९९९ असताना तेथे तब्बल ३ हजार २१९ बंदी आहेत. म्हणजेच क्षमतेच्या तिपटीहून अधिक बंदी येथे ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा तब्बल २ हजार २२० बंदी अधिक आहेत.
येरवडा आणि ठाण्यात किती गर्दी?
येरवडा मध्यवर्ती कारागृहात २ हजार ७७७ जागांच्या तुलनेत ६ हजार ९६९ बंदी आहेत. येथे क्षमतेपेक्षा ४ हजार १९२ बंदी अधिक आहेत. ठाण्यातील १ हजार १४१ जागांमध्ये २ हजार ८०३ बंदी असून अतिरिक्त बंदींची संख्या १ हजार ६६२ आहे. दोन्ही कारागृहांतील संख्या क्षमतेच्या जवळपास अडीचपट आहे.
नागपूरसह इतर कारागृहांची स्थिती काय?
नागपूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता १ हजार ९४० असून तेथे २ हजार ६५५ बंदी आहेत. तळोज्यात २ हजार २२४ जागांच्या तुलनेत ३ हजार २५२, छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार २१४ जागांच्या तुलनेत १ हजार ९०८, नाशिक रोडमध्ये ३ हजार २०८ जागांच्या तुलनेत ३ हजार ८४३ बंदी आहेत. अमरावतीमध्ये ९७३ जागांमध्ये १ हजार २१७, तर कोल्हापूरमध्ये १ हजार ६९९ जागांच्या तुलनेत १ हजार ८६५ बंदी आहेत.
न्यायाधीन बंदींचे प्रमाण किती?
राज्यात ३३ हजार ६६२ न्यायाधीन बंदी असून एकूण बंदींच्या तुलनेत त्यांचे प्रमाण तब्बल ८३.३ टक्के आहे. त्यात ३२ हजार १८५ पुरुष, १ हजार ४६२ महिला आणि १५ तृतीयपंथी आहेत. याशिवाय ६ हजार ४२८ दोषसिद्ध आणि ३२२ स्थानबद्ध बंदी आहेत.
आसरा संघटनेचे म्हणने काय ?
कारागृहांमधील अतिरिक्त गर्दीमुळे मूलभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर ताण येत आहे. शासनाने क्षमता वाढवून गर्दी कमी करण्यासाठी तातडीने ठोस उपाय करावेत. – संजय थुल, अध्यक्ष, आसरा
