अकोला : भूमी अभिलेख विभागाच्या मदतीसाठी आता खासगी भूमापक नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे जमीन मोजणी जलद गतीने पूर्ण होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली. जिल्ह्यातील मूर्तिजापुर तालुक्यातील लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे ,वसंत खंडेलवाल,माजी आमदार बळीराम सिरस्कार,लाखपूरी सरपंच राजू कैथवास, मुर्तिजापूर नगराध्यक्ष हर्षल साबळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना आदींसह महसूल अधिकारी उपस्थित होते.

१०० खासगी भूमापक

महाराजस्व अभियान शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या असून याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अकोला जिल्ह्यात भूमी अभिलेख विभागाच्या मदतीसाठी १०० खासगी भूमापक नियुक्त करण्यात येणार आहे. यामुळे शेती, प्लॉट मोजणी जलद गतीने होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेत रस्ते टप्प्याटप्याने पूर्ण होणार असून दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना थेट शेतीच्या बांधापर्यंत पोहोचणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

पट्टेवाटपाचा ऐतिहासिक निर्णय

पट्टेवाटपाचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असून त्याची नोंदणी केवळ एक हजार रुपयात केली जाईल. शेती मोजणी प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पोट विषयाची मोजणी सुद्धा केवळ २०० रुपयांचे शुल्क भरून केली जाईल, अशी व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहे. येत्या दोन वर्षात शेती मोजणीचा अर्ज केल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत प्रक्रिया पूर्ण व्हावी या उद्देशाने प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

भूखंडाच्या मालकी हक्कातील अडथळे दूर

तुकडे बंदी कायद्यात झालेल्या सुधारणांमुळे आता गुंठेवारी व लहान भूखंडाच्या मालकी हक्कातील अडथळे दूर झाले असून गतिमान प्रशासनामुळे हे शक्य झाले आहे, असे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले. झोपडपट्टी पुनर्वसन आणि ‘सर्वांसाठी घरे’ ते स्वप्न महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नातून पूर्ण होत असून मालकी हक्काचे पट्टे वाटप व त्याची नोंदणी करण्याबाबत सुद्धा महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला असल्याने हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे आमदार हरीश पिंपळे म्हणाले.