हुश्श, संपले एकदाचे हिवाळी अधिवेशन. जसजशी वर्षे सरत आहेत तसतसे हे अधिवेशन का व कशाला होते या प्रश्नाची तीव्रता साऱ्यांच्या मनात वाढत चालली आहे. दरवर्षी खालावत जाणारा दर्जा हे या अधिवेशनाचे ठळक वैशिष्ट्य. या दर्जाहीनतेत प्रत्येकवेळी भर पडत जाते. यंदाही यात काहीही नाविन्य नव्हते. अलीकडे राजकारणात ‘दिसण्याला’ महत्त्व आलेले. मग तो विकास असो की तो केला असे सांगणारा नेता. जे दिसत नाही तो विकास नाही व नेता तर नाहीच नाही. या दिसण्याची अगदी साधी सोपी व सरळ व्याख्या एकजात साऱ्यांनी आत्मसात केलेली. दिवसभर निरर्थक बडबड करत राहणाऱ्या वृत्तवाहिन्या व त्यावर संधी मिळाली नाही तर समाजमाध्यमे यावर एकदा चमकायला मिळाले की झाला अधिवेशनाचा हेतू सफल. विदर्भाचे प्रश्न काय, ते तर नेहमीचेच. ते मांडूनही त्याला टीआरपी मिळत नाही. मग जे गाजत नाही त्याला हात कशाला घालायचा असा साधा हिशेब सगळ्यांनी केलेला. यात मंत्री, आमदार, एरवी अदृश्य म्हणून ओळखले जाणारे प्रशासन, नेते, कार्यकर्ते सारेच आलेत.
एकदा ही दिसण्याची भावना मनी रुजल्यावर करायचे काय तर रोज आकर्षक असे कपडे परिधान करायचे. चेहरा सजवायचा. आपण कुणीतरी खास आहोत हे भासवण्यासाठी दोनचार चमचे सोबत ठेवायचे. त्यातल्या एकाच्या हाती मोबाईलचा कॅमेरा द्यायचा. मग सर्वांचे लक्ष वेधले जाईल अशा तऱ्हेने विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करायचा. सभागृहात जाऊन नावापुरती हजेरी लावली की पुन्हा आवारात भटकायचे. सध्या शेकड्याने झालेल्या वृत्तवाहिन्या व स्वयंघोषित डिजीटल पत्रकारांचा तळ जिथे पडला आहे त्याच्या आसपास रेंगाळायचे. सतत दिसण्यासाठी पूरक ठरणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत आपला सहभाग कसा नोंदवता येईल यासाठी प्रयत्न करत राहायचे. मतदारसंघातल्या एखाद्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचे असेल तर चित्रविचित्र कपडे घालून व पिकांच्या माळा गळ्यात टाकून यायचे. हे प्रश्न मांडण्याची जागा सभागृह आहे, विधिमंडळाच्या आवारात असलेली भलीमोठी पायरी नाही याचाच विसर साऱ्यांना पडलेला.
हे सारे बघितल्यावर दिसण्याला महत्त्व देणारे हे सारे लोकांचे प्रतिनिधी आहे की सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारे व कॅटवॉक करण्यात धन्यता मानणारे स्पर्धक असा प्रश्न कुणालाही पडावा. बरं, हे दिसणे अथवा दाखवणे कुणासाठी असते तर ते ज्यांचे प्रतिनिधित्व करतात त्या जनतेसाठी. रोज त्या आवारात चालतानाचे, जेवतानाचे छायाचित्र माध्यमावर चिकटवून, बघा, तुमचा नेता कसा काम करतो ते, असे दाखवण्याची जणू स्पर्धाच साऱ्यांमध्ये सुरू झालेली. जणू काही प्रश्न, समस्या सोडवण्याचे हेच एकमेव माध्यम आता शिल्लक उरले आहे, संसदीय आयुधे पार लयाला गेली आहेत असाच साऱ्यांचा समज व्हावा असे हे वर्तन. चीड, राग व संताप आणणारे. दुर्दैव हे की या दिसण्याच्या स्पर्धेतून कुणीही सुटलेले नाही. जणू काही दिसले नाही तर लोकांचे प्रश्नच सुटणार नाही अशी भावना साऱ्यांची झालेली. याचा अर्थ सभागृहात काहीच होत नाही, गंभीर चर्चा घडत नाही असे नाही. ती ठरलेल्या कामकाज पत्रिकेनुसार होतेच पण त्यात भाग घेत अभ्यासपूर्ण भाषण करून प्रसिद्धी मिळत नाही त्याचे काय हाच एकमेव प्रश्न साऱ्यांना सतावत असलेला व त्याचे उत्तर सर्वांनी असे दिसण्यातून शोधलेले.
अलीकडे याच उत्तराचा अवकाश अधिक व्यापक होत चाललेला. म्हणजे असे की दिवसभराचे कामकाज संपल्यावर नेतेमंडळी सायंकाळी काय करतात हेही लोकांना दिसू लागलेले. कुठे हुरडा पार्टी आहे, कुठे गाण्याची मैफील आहे, कुठे अन्य कुठला सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर तिथे हजेरी लावायची. संधी मिळाली तर गाणे म्हणायचे. स्थानिक नेते व पक्षांनी आयोजित केलेल्या रात्रीभोजांना हजेरी लावायची. दिसण्यासाठी आवश्यक असलेले फोटोसेशन योग्य पद्धतीने पार पडेल याची खबरदारी घ्यायची. मग पुन्हा दुसरा दिवस उगवला की नव्या वेशात दिसण्याचे तेच प्रयोग सुरू. हे सारे करताना बंगले व आमदार निवास सोडून पंचतारांकित हॉटेलात निवास शोधायचा तसेच तिथले ‘फुटेज’ बाहेर येणार नाही याची काळजी कसोशीने घ्यायची. सौंदर्य स्पर्धेत स्पर्धकांना अशीच निवासव्यवस्था दिली जाते.
अधिवेशनात बघायला मिळणारे चित्र त्याच्याच जवळ जाणारे. हे चाललेय काय? यात विदर्भ आहे कुठे? या भागाचे प्रश्न तसेच राहून यानिमित्ताने होणारा दौलतजादा नेमका कुणाच्या खिशात जातो याच्याशी कुणालाही सोयरसुतक नाही. नेत्यांच्या या प्रयोगाची लागण आता कार्यकर्त्यांना सुद्धा झालेली. साऱ्यांचा कल विधिमंडळाच्या आवारात जाऊन लाल गालिच्यावर छायाचित्र कसे काढता येईल याकडे वाढलेला. या धुंदीत आपण मतदारसंघातून येताना कुणाचे काम घेऊन आलेलो याचाही विसर अनेकांना पडत चाललेला. आठ किंवा पंधरा दिवस मौजमजा करा, पाहुणचार झोडा, कुणी दाराशी आलाच तर त्याला खोटी खोटी आश्वासने देऊन त्याची बोळवण करा याच मस्तीत सारे मश्गूल झालेले. अधिवेशन संपण्याच्या आधी सरकार विदर्भासाठी काही ना काही घोषणा करून वेळ मारून नेतच असते. तेच काय ते फलित असे जनतेला सांगून मोकळे व्हायचे.
उगीच ताण कशाला पदरी बाळगायचा हीच वृत्ती साऱ्यांमध्ये ठासून भरलेली. आलोच आहोत तर पक्षाच्या दोनचार बैठका घेऊन टाकू. यातून विस्तार होत असेल तर बरेच बरे याकडेही अनेक नेत्यांचा कल वाढलेला. कुणी एखादा पोटतिडकीने प्रश्न मांडू लागला, ते मांडता मांडता भांडणावर येऊ लागला तर कशीबशी त्याची समजूत काढून ‘काय हो, तुमच्याकडची थंडी’ असा निरर्थक टोमणा मारण्यात नेते वाकबगार झालेले. थंडीने भागले नाहीच तर ‘किती तिखट खाता हो तुम्ही’ हा टोला अगदी ठरलेला.
अलीकडे भाजप सत्तेत आल्यापासून विदर्भाविषयीचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमध्ये एकप्रकारची सुस्ती आलेली. राज्याचे नेतृत्वच विदर्भातील नेत्यांकडे. मग ते सोडवतील की तुमचे प्रश्न, कशाला काळजी करता हे अलीकडे तोंडावर फेकले जाणारे नवे उत्तर. सत्तेची धुरा सांभाळणारे हे नेते जणू काही अल्लाउद्दीनचा दिवाच घेऊन आले आहेत व सगळे प्रश्न चुटकीसरशी सोडवतील अशीच साऱ्यांची अपेक्षा. यात सर्व लोकप्रतिनिधी आलेले. विदर्भातील शेतकरी आज बेजार झालेला. एकीकडे अतिवृष्टी व दुसरीकडे भाव नसल्याने कोंडीत सापडलेला. त्यावर अवघ्या काही तासाची चर्चा. यंदा तर त्यावर सरकारचे उत्तरही नाही. तरीही त्याचे कुणाला काही वाटत नाही. नेत्यांनी मात्र इथली दिसण्याची स्पर्धा संपली की लगेच पुढील अधिवेशनाची तयारी करायची. प्रश्न हा की हे दुष्टचक्र कितीकाळ सुरू राहणार? विदर्भाविषयी फुकाचा कळवळा घेण्याचे हे सोंग आणखी किती दिवस चालू राहणार? त्यापेक्षा या अधिवेशनाला एकदाची मूठमाती देणेच उत्तम!
