लोकसत्ता टीम

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये काट्याची लढत सुरू आहे. मतमोजणीमध्ये सहाव्या फेरीपासून काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी आघाडी घेतली. सहाव्या फेरी अखेर डॉ. अभय पाटील यांना ५ हजार ६९३ मताधिक्य मिळाले.

अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. २६ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आज सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ अशा एकूण ८४ टेबलवर करण्यात येत आहे. १८ लाख ९० हजार ८१४ मतदारांपैकी ११ लाख ६८ हजार ३६६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे अभय पाटील व भाजपचे अनुप धोत्रे यांच्यात लढत दिसून येत आहे. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. पहिल्या फेरीमध्ये अभय पाटील यांना १६ हजार ५२३, अनुप धोत्रे १५ हजार ०४६ तर प्रकाश आंबेडकर यांना १२ हजार ४१९ मते पडली. पहिल्या फेरीत अभय पाटील यांनी १ हजार ४७७ मतांनी आघाडी घेतली.

आणखी वाचा-Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : विकास ठाकरेच्या मतदारसंघातून नितीन गडकरींना मताधिक्य

दुसऱ्या फेरीमध्ये अभय पाटील यांची आघाडी ४ हजार ४८८ मतांनी वाढली. तिसऱ्या फेरीमध्ये ४ हजार ४५५ मतांनी अभय पाटील आघाडीवर राहिले. चौथ्या फेरीमध्ये अभय पाटील यांची आघाडी ३ हजार ३६९ वर आली. पाचव्या फेरीमध्ये डॉ. अभय पाटील यांचे मताधिक्य २ हजार ०९५ वर मतांवर घसरले. सहाव्या फेरीमध्ये पुन्हा डॉ. अभय पाटील यांची आघाडी वाढली. सहाव्या फेरीअखेर काँग्रेसला ५ हजार ६९३ मतांची आघाडी झाली. डॉ. अभय पाटील यांना सहाव्या फेरीनंतर १ लाख ३ हजार ३६४, भाजपचे अनुप धोत्रे ९७ हजार ६७१ आणि प्रकाश आंबेडकर यांना ७२ हजार ४३७ मते मिळाली. मतमोजणीदरम्यान काही यंत्रात तांत्रिक अडचण आली होती.