नागपूर : महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) निवडणुकीत यंदा राजकीय रंग चढल्याचे स्पष्ट दिसून आले. निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वतोपरी प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) मध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप डॉक्टरांकडून करण्यात आला. मात्र निकालात भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडाला, तर ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’ने दणदणीत विजय मिळवला.

भाजपकडून ‘आयएमए परिवर्तन पॅनल’च्या मागे जोर लावण्यात आला होता. हा पॅनल आयएमएचा अधिकृत पॅनल असल्याचा दावा करत होता. या पॅनलसाठी मतदानाच्या दिवशी मंत्री आशिष शेलार यांची मतदान केंद्रांवर उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’ने उभारलेल्या लढ्याला यश मिळाले. भाजप पुरस्कृत पॅनलला मतदारांनी नाकारत ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’ला स्पष्ट कौल दिला. या पॅनलने नऊपैकी तब्बल आठ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. विजयी पॅनलच्या मागे राज्यातील सर्व आयएमएच्या माजी राज्य अध्यक्षांनी ताकद लावली होती.

भाजप पुरस्कृत एकमेव विजयी उमेदवार कोण?

या निवडणुकीत कराड उज्वला किशनराव या भाजपने जोर लावलेल्या पॅनलमधील एकमेव विजयी उमेदवार ठरल्या. तर इतर सर्व आघाडीवर असलेले उमेदवार ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’चे आहेत.

‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’चे विजयी उमेदवार

निकालानुसार संतोष अप्पासाहेब कदम (७०३० मते), संजय साहेबराव कदम (६९०१ मते), निलेश वसंतराव निकम (५९८८ मते), संजय गणेशराव देशपांडे (५८०४ मते), सुनील माधवराव इंगळे (५६३० मते), अनिलकुमार भास्कर पाटील (५५५० मते), मंगेश मधुकर गुलवडे (५५०६ मते) आणि अनिल शंकर पाचनेकर (५१६७ मते) हे उमेदवार विजयी ठरले. या सर्व उमेदवारांना ‘आयएमए मेंबर एमएमसी पॅनल’चा पाठिंबा होता.

भाजपकडून एका नगरसेवकांवर पाच मतदारांची जवाबदारी..

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यातील सर्व नेते व पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेऊन ‘आयएमए अधिकृत’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला किमान पाच डॉक्टरांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते. यानुसार भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि पदाधिकारी यांनी एमएमसी निवडणुकीतील डॉक्टर मतदारांशी संपर्क साधला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या परिसरातील किमान पाच डॉक्टरांना ‘आयएमए अधिकृत’ पॅनलच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. हे सर्व प्रयत्न करूनही अखेर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.