यवतमाळ – ‘नीट’ परीक्षेतील कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि गुणांमधील घोटाळ्यांमुळे एकूणच डॉक्टरांच्या गुणवत्तेवर आणि संपूर्ण वैद्यकीय निवड प्रक्रियेवर समाजात प्रचंड अविश्वास निर्माण झाला आहे. या प्रवृत्तींमुळे प्रामाणिक विद्यार्थी आणि रुग्ण या दोघांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. अशावेळी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी ‘केवायडी’ म्हणजेच ‘नो युअर डॉक्टर’ अंतर्गत क्यूआर कोड दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे.
माहिती रुग्णांसमोर ठेवणे बंधनकारक
बँकिंग क्षेत्रातील ‘केवायसी’च्या धर्तीवर आता आरोग्य क्षेत्रातही डॉक्टरांना आपली संपूर्ण खरी माहिती रुग्णांसमोर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रत्येक डॉक्टरला आपल्या क्लिनिक किंवा हॉस्पिटलच्या दर्शनी भागात स्वतःचा विशिष्ट क्यूआर कोड लावणे सक्तीचे असेल. स्मार्टफोनच्या स्कॅनवर संबंधित डॉक्टरांची संपूर्ण शैक्षणिक पात्रता, एमएमसीकडील अधिकृत नोंदणी वैध आहे की नाही, आणि त्यांची खरी स्पेशलायझेशन काय आहे, याची माहिती काही सेकंदात रुग्णांच्या मोबाईल स्क्रीनवर येईल. आरोग्य क्षेत्रातील वाढत्या गैरप्रकारांना आणि विशेषतः ग्रामीण व शहरी भागात पसरलेल्या बोगस डॉक्टरांच्या सुळसुळाटाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी हे जुनेच पण प्रभावी तंत्रज्ञान आता रामबाण उपाय ठरणार आहे.
बोगस डॉक्टरांवर कायद्याचा वचक
प्रत्येक शासकीय अधिवेशन आणि आरोग्य विभागाच्या बैठकांमध्ये डॉक्टरांच्या प्रमाणीकरणाचा मुद्दा प्रशासनाकडून सातत्याने लावला जात होता. अखेर यावर सक्तीचे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन यवतमाळचे अध्यक्ष डॉ. आशिष तावडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा हा निर्णय अत्यंत स्पृहणीय असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अप्रशिक्षित व्यक्ती, कंपाऊंडर किंवा कोणतेही अधिकृत वैद्यकीय शिक्षण नसलेले लोक सर्रास आरोग्य सेवा देत रुग्णांची फसवणूक करत आहेत. मात्र, डॉक्टरांनी रुग्णालयाच्या दर्शनी भागात ‘केवायडी क्यूआर कोड’ लावल्यास रुग्णांना संबंधित डॉक्टर ॲलोपॅथी विषयक आहेत की नाही, त्यांच्याकडे नोंदणी प्रमाणपत्र आहे की नाही हे स्पष्टपणे समजेल. यामुळे बोगस डॉक्टरांवर कायद्याचा वचक बसेल आणि रुग्णांचे आरोग्य सुरक्षित राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. तावडे यांनी दिली.
रुग्णांचे सक्षमीकरण आणि विश्वासार्हतेचे पुनरुज्जीवन
या ‘क्यूआर कोड’ पद्धतीमुळे रुग्णांची फसवणूक टळेल आणि त्यांना योग्य, कायदेशीर व तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार मिळण्याची हमी मिळेल. जेव्हा एखादा रुग्ण क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांची कुंडली स्वतः स्कॅन करून बघेल, तेव्हा त्याच्या मनातील पात्रतेविषयीची शंका पूर्णपणे नष्ट होईल. नीट घोटाळ्याने वैद्यकीय क्षेत्राच्या प्रतिमेला लावलेला डाग पुसून काढण्यासाठी आणि रुग्णांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ‘केवायडी’ची ही सक्ती रुग्णांच्या मनात वैद्यकीय क्षेत्राबद्दल पुन्हा विश्वास निर्माण करणारी ठरते की, निव्वळ फार्स हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
