Maharashtra Government Jobs 2026: राज्यात पारदर्शक पद्धतीने ४० हजार पोलिसांसह सुमारे एक लाख नोकरभरती करण्यात आली. प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार असून त्यानंतर पुढील वर्षी विविध विभातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा महाभरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही महाभरती एप्रिलमध्ये होणार आहे. त्यामुळे इच्छुक तरुण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कुठल्या विभागात किती जागांसाठी पदभरती होणार ते पाहूया.

१५० दिवसांचा कार्यक्रम

राज्य प्रशासन अधिक सक्षम आणि गतिशील करण्यासाठी सरकारने सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणांचे निराकरण तसेच राज्य लोकसेवा आयोगामार्फत पारदर्शक भरती प्रक्रिया राबविण्यावर भर दिल्याचे सांगून मु्ख्यमंत्री म्हणाले, राज्य लोकसेवा आयोगाची पदभरती प्रक्रिया गतीशील करण्यासाठी अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समितीच्या माध्यमातून विविध राज्यांचा अभ्यास करून निर्णय घेणार आहोत. राज्याचे प्रशासन हे संस्थात्मकदृष्ट्या बळकट करण्याबरोबरच ते गतिशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख करण्यास प्राधान्य दिले असून यासाठी १०० दिवसांचा आणि नंतर १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

सेवा नियम बदलणार

अनेक विभागांचे सेवा प्रवेश नियम ५० वर्षे जुने होते. तंत्रज्ञानातील बदलांमुळे अगदी लिपिकापासून ते वरच्या स्तरापर्यंत पदांचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत, पण नियमांमध्ये बदल झाले नव्हते. रिक्त पदे भरण्यासाठी हे सेवा प्रवेश नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू केला.अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित होत्या, अनेक पात्र कुटुंबे, ज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची मुले आणि पत्नी यांचा समावेश होता.

याबाबतचे सर्व शासन निर्णय बदलून एक सुटसुटीत आणि सोपा शासन निर्णय तयार केला. अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांच्या घरी एखादा अपघात झाल्यास, त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही काम केले. याच बदलांमुळे आज ८० टक्के अनुकंपाच्या जागा भरल्या गेल्या आहेत, आणि उर्वरित २० टक्के जागाही लवकरच भरल्या जातील असेही त्यांनी सांगितले.

या विभागात भरती

पोलीस विभाग – २००००
तलाठी – १७००
जलसंपदा विभाग – १४०००
सहाय्यक प्राध्यापक भरती – ५०००
महसूल विभाग – २०००
शालेय शिक्षक – १०००
लिपिक टंकलेखक – २१००