नागपूर : देशातील प्रमुख खनिजांच्या उत्पादनमूल्यात वाढ झाली असली, तरी महाराष्ट्राने त्यापेक्षा कितीतरी वेगवान झेप घेतली आहे. लोहखनिजाच्या बाबतीत तर राज्याची वाढ राष्ट्रीय वाढीच्या दहापटीहून अधिक आहे. भारतीय खान ब्युरोच्या ताज्या अहवालातून महाराष्ट्राच्या खनिज उत्पादनाचे बदललेले चित्र समोर आले आहे. नेमकी किती वाढ झाली आणि कोणत्या खनिजात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली? जाणून घेऊया…
अहवालात नेमके काय समोर आले?
केंद्रीय खाण मंत्रालयाच्या भारतीय खान ब्युरोने ‘मे २०२६ मधील मासिक खनिज उत्पादनाची आकडेवारी’ प्रसिद्ध केली आहे. त्यात एप्रिल-मे २०२५ आणि एप्रिल-मे २०२६ या कालावधीची तुलना करण्यात आली. देशातील प्रमुख खनिजांच्या उत्पादनमूल्यात २७.६ टक्के वाढ झाली. महाराष्ट्रातील वाढ मात्र तब्बल ५७.६ टक्के आहे. म्हणजेच राष्ट्रीय वाढीच्या दुपटीहून अधिक वाढ महाराष्ट्राने नोंदवली.
महाराष्ट्राच्या खनिज उत्पादनाचे मूल्य किती?
महाराष्ट्राचे खनिज उत्पादनमूल्य गेल्या वर्षी १,४०२ कोटी रुपये होते. यंदा ते २,२१० कोटी रुपयांवर पोहोचले. देशातील उत्पादनमूल्यात महाराष्ट्राचा वाटाही ४.८ टक्क्यांवरून ५.९ टक्क्यांपर्यंत वाढला.
लोहखनिजात महाराष्ट्राने किती मोठी झेप घेतली?
याच आकडेवारीत सर्वाधिक लक्षवेधी वाढ लोहखनिजाची आहे. देशातील लोहखनिज उत्पादन १५.८ टक्क्यांनी वाढले; तर महाराष्ट्रातील उत्पादनात तब्बल १७०.३ टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील उत्पादन २३ लाख ३४ हजार टनांवरून थेट ६३ लाख ७ हजार टनांवर पोहोचले. परिणामी देशाच्या लोहखनिज उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा ४.४ टक्क्यांवरून १०.३ टक्के झाला. राज्यातील लोहखनिजाचे उत्पादनमूल्यही ९५० कोटींवरून १,५६५ कोटी रुपये झाले.
बॉक्साइटमध्ये देशाची घट, महाराष्ट्राची स्थिती काय?
देशातील बॉक्साइट उत्पादन ७.७ टक्क्यांनी घटून ४४ लाख ८० हजार टन झाले. याउलट महाराष्ट्रातील उत्पादन २ लाख ९३ हजार टनांवरून ४ लाख १६ हजार टनांवर गेले. त्यामुळे राष्ट्रीय उत्पादनातील राज्याचा वाटा ६ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांपर्यंत वाढला.
इतर खनिजांची आकडेवारी काय सांगते?
देशातील मँगनीज उत्पादन ६ लाख ७७ हजार टनांवरून ८ लाख ५ हजार टन झाले, तर महाराष्ट्रातील उत्पादन १ लाख ९७ हजार टनांवरून २ लाख ६ हजार टनांवर पोहोचले. चुनखडी उत्पादनात देशात ७.७ टक्के, तर महाराष्ट्रात ९.८ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
देशात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?
मे २०२६ मध्ये महाराष्ट्राचे खनिज उत्पादनमूल्य १,२९० कोटी रुपये होते. देशाच्या एकूण उत्पादनमूल्यात ६.५ टक्के वाट्यासह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर राहिला. ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या पुढे आहेत. या उत्पादनमूल्यात इंधन, अणुऊर्जा आणि गौण खनिजांचा समावेश नाही. तसेच मे २०२६ ची आकडेवारी तात्पुरती आहे.
