वर्धा : विधान परिषदेच्या ९ जागा ( MLC ) रिक्त झाल्यात. आता त्यासाठी निवडणूक घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार १२ मे रोजी ही निवडणूक होणार असून २३ ते ३० एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ५, शिवसेना शिंदे गटाचे २, राष्ट्रवादी अजित पवार गट व महाविकास आघाडी प्रत्येकी एक उमेदवार निवडून येवू शकतो, असे गणित मांडल्या जाते. यातील दोन जागा विदर्भातील आहेत.

विदर्भातील रिक्त होणाऱ्या जागा कोणत्या?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजल्या जाणारे संदीप जोशी व आर्वीचे दादाराव केचे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपली. आता या दोन रिक्त जागा परत विदर्भातील भाजप नेत्यांना मिळणार की त्या अन्य विभागात जाणार, असा प्रश्न भाजप वर्तुळात चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, निवृत्ती जाहीर करणारे संदीप जोशी यांनाच परत उमेदवारी द्यावी, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची चर्चा आहे. त्यांना विधान परिषद सभागृहात अधिक काळ मिळावा, असा आग्रह धरल्या जातो. पण या जागेसाठी नागपुरातून अनेक इच्छुक असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक पण तयारीत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

दादाराव केचे

मागील विधानसभा निवडणूक आपल्या बंडखोरीने गाजवून सोडणारे आर्वीचे दादाराव केचे रिंगणात आहेच. विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलून सुमित वानखेडे यांना संधी देण्यात आली होती. मात्र त्याचवेळी त्यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या दारी नेते हमी देण्यात आली होती. ती म्हणजे विधान परिषद सभागृहात पाठविण्याची. ती वचनपूर्ती झाली. मात्र अवघा १३ महिन्याचा कालावधी केचे यांना मिळाला. म्हणून केचे पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. ते म्हणतात, मी माझी भावना पक्ष नेत्यांना सांगितली आहे. परत संधी मिळेल अशी खात्री वाटते. प्रयत्न करणे आपले काम आहे.

भाजपची भूमिका

या विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काल, मंगळवारी मुंबईत एक बैठक झाल्याची माहिती आहे. भाजप कोअर समितीची ही बैठक होती, असे एका नेत्याने स्पष्ट केले. यात काही नावे ठरली. पण अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीतच होणार, असेही स्पष्ट करण्यात आले. विदर्भातील या रिक्त दोन जागी परत वैदर्भीय नेता येणार, एक नागपूर व एक अमरावती विभागात देणार की दोन्ही जागा अन्य विभागात जाणार, अशी शंका व्यक्त होत आहे. नवे चेहरे द्यायचे ठरल्यास माजी खासदार रामदास तडस यांचा विचार होण्याची शक्यता पक्ष पातळीवार व्यक्त झाली. मात्र स्वतः तडस म्हणतात की, मला पक्षाने जबाबदारी द्यावी की देवू नये, हा सर्वस्वी पक्षाचा अधिकार आहे. अधिक भाष्य करणार नाही.