नागपूर : दक्षिण कोकणात सहा जूनला मोसमी पाऊस दाखल झाला. त्यानंतर आठ जूनला दक्षिण मध्य महाराष्ट्रात तो दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली. मात्र, मोसमी वाऱ्यांची रचना, तापमानातील बदल आणि इतर निकषांच्या पातळीवर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील मोसमी पावसाच्या घोषणेवर हवामान संशोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
हवामान खात्याची घोषणा
भारतीय हवामान खात्याने सहा जूनला दक्षिण कोकणात तर आठ जूनला दक्षिण मध्य महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाची घोषणा केली. रविवारी रात्रीपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी मेघगर्जन आणि वादळीवाऱ्यांसह पाऊस झाला. सांगली येथे ८३ मिलीमीटर, धाराशिव येथे ५७ मिलीमीटर तर सोलापूर येथे आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सध्या पडत असलेला पाऊस खऱ्या अर्थाने मोसमी पाऊस आहे का, यावर अभ्यासकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मान्सूनचे निकष काय
एखाद्या भागात मोसमी पाऊस दाखल होत असेल तर केवळ पावसाची नोंद पुरेशी नाही. जमिनीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीपर्यंत मोसमी पावसाचे वारे दिसलाला हवे. ते अरबी समुद्रातून यायला हवे. तसेच तापमानात घट, आकाशात ढगांचे सातत्यपूर्ण आच्छादन आणि रात्रीच नाही तर दिवसा देखील विविध वेळांमध्ये पडणारा पाऊस या मोसमी पावसाच्या निकषांची पूर्तता कुठेच झालेली नाही. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर अपेक्षत तापमानातील घट अद्याप दिसून आलेली नाही. याउलट सोलापूरमध्ये ३८ तर सांगलीत ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले.
शेतकऱ्यांना फटका बसू शकतो
दरम्यान हवामान विभागाने येत्या दोन ते तीन दिवसात मोसमी पावसाचे वारे आणखी पुढे सरकेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात पुढील काळात पावसाचा जोर कमी होण्याची, तापमान वाढण्याची आणि मोसमी पावसाच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी हा निर्णायक काळ आहे आणि अशावेळी मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पेरणी झाली आणि मग त्यानंतर पाऊस थांबला आणि तापमानात वाढ झाली, तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो, असेही हवामान संशोधकांचे म्हणणे आहे.
डॉ. अक्षय देवरस म्हणतात..
मोसमी पावसाची घोषणा करताना पाऊस आणि वाऱ्याची स्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मोसमी पावसाचे आगमन झाल्यास हवामानात बरेच बदल दिसून येतात. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जमिनीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीपर्यंत वारे पश्चिमेकडून म्हणजेच अरबी समुद्राकडून येतात. या काळात ढगांचे प्रमाण वाढते आणि तापमान कमी होते. पाऊस हा रात्रीच नाही तर दिवसासुद्धा पडतो. सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्रात येणारे वारे अफ्रिकेकडून येणारे आहेत आणि त्याचा मोसमी पावसाची काहीही संबंध नाही. याउलट येत्या किमान एक आठवडाभर राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचे आणि तापमान अधिक राहण्याचे संकेत आहेत, असे डॉ. अक्षय देवरस, वरिष्ठ हवामान संशोधक, रेडिंग विद्यापीठ, यूके म्हणाले.
गजानन जाधव म्हणतात
हवामानाचा अंदाज देणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, या स्थितीत विचलित न होता विश्वासपूर्ण हवामान अंदाजावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वादळी पावसात पेरणीचा निर्णय घेतला तर काही ठिकाणी धूळपेरणी केली. हे अलनिनोचे वर्ष असल्यामुळे पाऊस कमीच असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन गजानन जाधव, कृषीअभ्यासक व संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ट ट्रस्ट यांनी केले.
