नागपूर : केरळमध्ये आगमनानंतर वेगाने आगेकूच करणारा नैऋत्य मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला असून पुढील ४८ तासांत राज्यात प्रवेश करण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील हवामानात सातत्याने बदल
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल होत असून अनेक भागांत पूर्वमान्सून सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५ ते ११ जूनदरम्यान पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम ठेवण्यात आला असून दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
मान्सूनचा प्रारंभिक अंदाज चुकला
यंदा मान्सूनच्या आगमनाबाबतचा प्रारंभिक अंदाज चुकला असला तरी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेग पकडला आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तो अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पूर्वी करवार परिसरात काही दिवस रेंगाळणारा मान्सून यंदा अवघ्या २४ तासांत गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचला आहे. विदर्भात सध्या उष्णतेचा प्रभाव कायम असला तरी ७ ते ९ जूनदरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर ५ ते १० जूनदरम्यान ताशी ६० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सूनची महाराष्ट्रातील अधिकृत नोंद येत्या दोन दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे.
