नागपूर : बंगालच्या खाडीत नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली असून, तिचे पुढे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होणार का, याकडे हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. या प्रणालीचा परिणाम विदर्भातील पावसावर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला तरी कोकणात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात पावसाचा जोर वाढणार !
बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागासह पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीलगतच्या भागात २९ ऑगस्टच्या सुमारास नव्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर पुढील तीन दिवस वाढण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या शुक्रवारच्या अंदाजानुसार, विदर्भात आज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, २९ ऑगस्टला पावसाचे प्रमाण वाढून अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० ऑगस्ट आणि ३१ ऑगस्टलाही काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा इशारा
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे. नागपूर आणि भंडारा येथे २९ व ३१ ऑगस्टला, तर गोंदियात २९ व ३० ऑगस्टला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. गडचिरोलीत ३० ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ईशान्य उत्तर प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील २४ तासांत क्षीण होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागरातील वातावरणीय स्थितीमुळे नव्या प्रणालीची निर्मिती होणार असल्याने विदर्भातील पावसाच्या स्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. पुढील सात दिवस कमाल आणि किमान तापमानात मोठा बदल होणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
सप्टेंबरमध्ये पावसाची प्रणाली सरकणार
सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाची प्रणाली दक्षिणेकडील कोमोरीन क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. या काळात महाराष्ट्र, तेलंगणा आणि किनारपट्टीच्या कर्नाटकात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा जोर उत्तरेकडील भागात हळूहळू कमी होत असताना महाराष्ट्रातील पावसाची स्थिती संमिश्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाचे वितरण शेतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
