नागपूर : गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस उरला असताना बाप्पाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज होत असतानाच वरुणराजानेही हजेरी लावली आहे. कालपासूनच विदर्भातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली असून, आजही राज्यातील विविध भागांत पावसाची संततधार आणि सरी सुरू आहेत. गेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्याच्या हवामानावर जाणवू लागला असून, पुढील काळात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात कालपासून पावसाची हजेरी
गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला असतानाच विदर्भातील अनेक भागांत कालपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आजही अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण कायम असून, काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होत आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच पावसाचीही साथ मिळताना दिसत आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागांत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
याठिकाणी देखील पाऊस
नाशिकच्या घाटमाथ्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता असून, या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, अकोला आणि अमरावती येथेही विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बाप्पाच्या स्वागताला पावसाची साथ
गणरायाच्या आगमनासाठी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणेशमूर्तींचे आगमन, मंडपांची सजावट आणि बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू असतानाच राज्याच्या अनेक भागांत पाऊस बरसत आहे. त्यामुळे ‘बाप्पाच्या स्वागताला वरुणराजाचीही हजेरी’ असे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. मात्र, पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने गणेशभक्तांसह नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः मंडप उभारताना सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, तसेच विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
