नागपूर : केरळमध्ये वेळेआधीच दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात देखील नियोजित वेळेआधीच पोहोचलेल्या नैऋत्य मान्सूनची वाटचाल गेल्या काही दिवसांपासून मंदावली होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरासह समुद्रातील वातावरणीय परिस्थिती पुन्हा अनुकूल झाल्याने मान्सूनने पुन्हा एकदा वेग पकडला आहे.
हवामान खात्याने शक्यता वर्तवली
आंध्र प्रदेशचा उर्वरित भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, पश्चिम-मध्य बंगालचा उपसागर तसेच तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांत मान्सूनने प्रगती केली असून महाराष्ट्राच्या उर्वरित भागांतही पुढील चार ते पाच दिवसांत त्याची आगेकूच होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनला मान्सूनची उत्तरेकडील मर्यादा अरबी समुद्रातील १८ अंश उत्तर अक्षांशापासून हरनाई, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुझफ्फरपूर मार्गे नेपाळच्या सीमेकडे पोहोचली आहे. यामुळे देशाच्या मध्य आणि पूर्व भागातील अनेक प्रदेश मान्सूनच्या प्रभावाखाली आले आहेत.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे काय?
यंदा मान्सूनने केरळमध्ये २४ मे रोजी प्रवेश करत विक्रमी लवकर हजेरी लावली होती. त्यानंतर ६ जूनला तो महाराष्ट्रात दाखल झाला. सुरुवातीला त्याची वाटचाल वेगाने सुरू असली तरी काही दिवसांपासून अनुकूल हवामान प्रणालींचा अभाव आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे त्याची प्रगती मंदावली होती. आता राज्यातील काही भागांत पावसाची उघडीप राहिली, तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णता आणि दमट वातावरण कायम राहिले. दरम्यान, सोलापूरमधील त्याच्या प्रवेशाच्या घोषणेवर हवामानतज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याठिकाणी मान्सूनची घोषणा हवामान खात्याने केली असली तरीही, नकाशातील चित्र मान्सूनची स्थिती दर्शवणारे नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण
आता परिस्थितीत बदल होत असून मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, महाराष्ट्रातील उर्वरित क्षेत्र, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकेल. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाच्या सरींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भासह राज्यातील अनेक भागांत सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. मान्सूनची प्रगती वेगाने सुरू राहिल्यास येत्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांत पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांना गती मिळण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
